चेन्नई, 8 मे : आयपीएल स्पर्धेचा चौदवा सिझन (IPL 2021) स्थगित झाला आहे. त्यानंतरही खेळाडूंना कोरोनाची (Covid-19) लागण झाल्याच्या घटना उघड होत आहेत. कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी केकेआरचा नितिश राणा (Nitish Rana) कोरोना पॉझिटीव्ह आढळला होता. त्यानंतर वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrier) यांना कोरोनाची लागण झाली. आता आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर केकेआरचा बॅट्समन टीम सिफर्ट (Tim Seifert) याला कोरोनाची लागण झाली आहे. सिफर्ट अन्य खेळाडूंसोबत न्यूझीलंडला रवाना होणार होता. आता त्याच्यावर चेन्नईमध्ये उपचार करण्यात येणार आहेत.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं याबाबत दिलेल्या माहितीनुसार, "आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या सिफर्टमध्ये कोरोनाची मध्यम लक्षणं आढळली आहेत. तो आता क्वारंटाईन कालावधी पूर्ण करेल. न्यूझीलंडमध्ये परत येण्यापूर्वी त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह येणं आवश्यक आहे. न्यूझीलंडमध्ये परतल्यानंतरही त्याला 14 दिवस इतरांपासून वेगळं राहवं लागेल."
" टीम सिफर्टचा यापूर्वी सात वेळा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. गेल्या 10 दिवसांमध्येच तो पॉझिटीव्ह आढळला आहे. ही टीमसाठी दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणात शक्य ती सर्व मदत आम्ही करणार आहोत," असं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी स्पष्ट केलं आहे.
विल्यमसननं सोडली दिल्ली
न्यूझीलंड आणि सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) दिल्लीहून मालदीवला गेला आहे. विल्यमसननं 10 मे पर्यंत दिल्लीतील बायो-बबलमध्ये राहणं आवश्यक होतं. मात्र राजधानीतील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन त्यानं तीन दिवसांपूर्वीच दिल्ली सोडली आहे.
कोरोनाग्रस्त वडिलांना बरं करण्यासाठी 'हा' खेळाडू IPL ची सर्व कमाई देण्यास तयार
विल्यमसनसह चेन्नई सुपर किंग्सचा मिचेल सँटनर (Mitchell Santner), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कायले जेमीसन (Kyle Jamieson) आणि सीएसकेचे फिजिओ टॉमी सिमसेक हे मालदीवला रवाना झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.