इस्लामाबाद, ता. 7 सप्टेंबर : पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. सीमेवर सांडलेल्या रक्ताचा आम्ही बदला घेणार आहोत अशी दर्पोक्ती त्यांनी केली. डिफेन्स डे च्या कार्यक्रमात बोलताना गुरूवारी त्यांनी ही मुक्ताफळं उधळली. यावेळी पंतप्रधान इम्रान खानही उपस्थित होते असं वृत्त पाकिस्तानच्या जीओ न्यूज नं दिलं आहे. पाकिस्तानकडे जे वाकड्या नजरेने बघतील त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असंही ते म्हणाले. आपल्या भाषणात बाजवा यांनी काश्मीर प्रश्नाचा उल्लेख करत काश्मिरमधल्या लोकांवर अत्याचार होत असल्याची नेहमीची टेपही वाजवली.
बाजवा भाषणात म्हणाले आमच्या सशस्त्र सेनेने देशाची सेवा करताना खूप काही गमावलं आहे. त्यापासून आम्ही अनेक गोष्टी शिकलोही आहोत. दहशतवादाचं सावट आमच्यावर आहे. पाकिस्तान हा दहशतवादाचा सर्वात मोठा पीडित देश आहे.
पाकिस्तानचे विभाजन करण्याचाही प्रयत्न झाला मात्र लष्करी जवान आणि नागरिकांनी शौर्य दाखवत हा प्रयत्न हाणून पाडला. 1965 आणि 1971 च्या युद्धातून देशानं धडा घेतला आहे. आज अवस्त्र असल्याने देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत झाली आहे.
दहशतवादीची देशाने मोठी किंमत चुकवली असून 70 हजार लोकांचा बळी गेलाय. त्यामुळं देशाचं कधीही न भरून येणारं नुकसान झालंय. काही दिवसांपूर्वीच इम्रान खान यांच्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गेलेले पंजाबचे मंत्री नवज्योसिंग सिद्धू यांनी बावजा यांची गळाभेट घेतली होती.
आम्हाला शांतता पाहिजे असं बावजा यांनी म्हटल्याची माहितीही सिद्धू यांनी नंतर पत्रकारांना दिली होती. आता काही दिवस जात नाहीत तोच त्यांनी भारताला धमकी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारने भारतासोबत शांतता चर्चेसाठी कितीही प्रयत्न केलेत तरी लष्कर ते प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: General Qamar Javed Bajwa, India, Kashmir, Pakistan army chief