श्रीनगर, 13 डिसेंबर : जम्मू-काश्मीरच्या (Jammu-kashmir) पुंच येथे भारतीय सैन्य आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने रविवारी चकमकी दरम्यान दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला. या दहशतवाद्यांनी पीर पंचाल भागातून घुसखोरी केली होती. घटनास्थळावरुन स्थानिक दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आलं. तिन्ही दहशतवादी दक्षिण काश्मीरमध्ये जाण्याच्या मार्गावर होते. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. आयजी जम्मू मुकेश सिंह यांनी दोन दहशतवाद्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, जिल्हा विकास परिषद (डीडीसी) निवडणुकीत गोंधळ घालण्याचा या अतिरेक्यांचा हेतू होता.
पोलिसांना सूचना मिळताच पुंचमध्ये मुघल रोडच्या पोशाना आणि डोगरा भागात संशयास्पद हालचाली दिसत होत्या. यादरम्यान पोलिसांना एका कुटुंबाकडून याबाबत तक्रार मिळाली. ज्यानुसार एक तरुण तालिब हुसैन 9 डिसेंबर पासून बेपत्ता होता. तो त्या भागात गेला होता, मात्र परतला नाही. पोलिसांनी संशयास्पद हालचाली पाहून सर्च ऑपरेशन सुरू केलं. ज्यामध्ये सैन्याची टीमही सोबत होती.
शस्त्रे व दारूगोळा जप्त
शोध मोहिमेदरम्यान पोशाना ते डोगंरा भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी टीमवर गोळीबार सुरू केला. यानंतर दोन्ही बाजूंनी चकमक सुरू झाली. या कारवाईत पोलीस व सैन्याच्या पथकाने एकापाठोपाठ दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर एका स्थानिक दहशतवाद्याला अटक केली गेली आहे. ठार झालेल्या अतिरेक्यांच्या ताब्यातून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. चौकशीदरम्यान मृतावस्थेत असलेले दोन्ही पाकिस्तानी दहशतवादी पीर पांचाळ भागातून घुसखोरी करून या बाजूस घुसल्याचे समोर आले आहे. त्यांना डीडीसी निवडणुकीत हल्ले करण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्याला नेण्यासाठी एक काश्मिरी दहशतवादी येथे आला होता, ज्याला या चकमकीत अटक करण्यात आली आहे.