#INDVsPak क्रिकेटचा खेळ 'देश की इज्जत' का सवाल होतो तेव्हा....

#INDVsPak क्रिकेटचा खेळ 'देश की इज्जत' का सवाल होतो तेव्हा....

सानिया मिर्झाला काही दिवसांसाठी सोशल मीडिया संन्यास घ्यावा लागला, कारण... आजची भारत पाकिस्तान मॅच आणि त्यापाठोपाठचे सोशल मीडिया ट्रोल्स.

  • Share this:

मुंबई, १९ सप्टेंबर - भारत- पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने-सामने येतात तेव्हा खेळाची रोमहर्षकता वाढते हे नक्की. पण या दोन प्रतिस्पर्ध्यांच्या बाबतीत तो निव्वळ खेळ राहात नाही. तर तो बनतो देशाच्या इभ्रतीचा मामला. इज्जतीला, अभिमानाचा सवाल होऊन जाते ही मॅच. पाकिस्तान संघाचं समर्थन भारतात राहून करणं अशक्य आणि असह्य असतं.

भारत पाकिस्तान सामन्याच्यावेळी अनेकांच्या देशप्रेमाच्या भावना उचंबळून येतात. देशप्रेमाला ना नाही, पण गुणवत्तापूर्वक खेळ म्हणून पाहणारं कुणी पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचं कौतुक करतं किंवा पाकिस्तानबाबत बोलतं तर भारतीय मनांना ते हल्ली अजिबात सहन होत नाही.

lokmat.tv18.comच्या वेबटीमनं मॅच सुरू होण्यापूर्वी एक फेसबुक लाईव्ह केलं. तेव्हाही पाकिस्तान जिंकू शकतो असं म्हणणाऱ्या आमच्या प्रतिनिधीला लगेचच कमेंट्सरूपी ट्रोल्सची चुणूक दिसलीच.

क्रिकेटच्या मैदानावर फॅन्सना आपल्या संघाचा पराभव सहन होत नाही, हे इडन गार्डनच्या एपिसोडनं कधीच दाखवून दिलं होतं. आता तर सोशल मीडियाचा याकामी शस्त्रासारखा वापर होतो.

सोशल मीडिया हे तर निर्बंध व्यक्त होण्याचं हक्काचं माध्यम. त्यामुळे पाकिस्तानच्या बाजूने ब्र जरी उच्चारला तरी कुठल्या भारतीयाचं काही खरं नसतं, मग तो क्रिकेटचा खेळ का असेना. सामान्य माणूससुद्धा या ट्रोलधाडीतून सुटू शकत नाही. सेलेब्रिटी असेल तर विचारायलाच नको... त्यातून अशी भारतीय सेलेब्रिटी जिने पाकिस्तानी खेळाडूशी लग्न केलंय, तिला तर ट्रोलधाडीचा सामना करायलाच लागतो.

टेनिसपटू सानिया मिर्झा हिचं हे ट्वीट वाचून याचा अंदाज येऊ शकतो. सानियानं पाकिस्तानचा माजी क्रिकेट कॅप्टन शोएब मलिकशी लग्न केलंय. आता ती कुणाच्या बाजून भारत की पाकिस्तान... यावरून तिला ट्रोल केलं जाण्याची ही काही पहिली वेळ नाही. प्रत्येक वेळी सोशल मीडिया युजर्सनी भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचच्या वेळी सानियाला टार्गेट केलेलं आहे. आता पुढचा धोका ओळखून सानियानं क्रिकेट मॅच सुरू व्हायच्या आधी २४ तास सोशल मीडियाला रामराम केलाय.

पुढचे काही दिवस तरी मी सोशल मीडिया सोडणार आहे. पुढच्या २४ तासात इथे उठणाऱ्या कल्लोळाने माझ्यासारखी प्रेग्नंट बाईच काय सामान्य माणूससुद्धा आजारी पडेल. त्यापेक्षा वेळीच इथून बाहेर पडलेलं बरं... असं सानियानं ट्विटरवरून साईन ऑफ होण्यापूर्वी लिहिलंय. ही निव्वळ क्रिकेट मॅच आहे... लक्षात असू द्या, अशी आठवणही ती शेवटी करते.

भारत पाक मॅच युद्धापेक्षा कमी नसते, हे देशातल्या वातावरणावरून लक्षात येतंच. तब्बल १४ महिन्यांनी हे दोन संघ एकमेकांसमोर येत आहेत. दोन्ही देशांच्या भूमीवर सामने होत नाहीतच. म्हणूनच आता दुबईच्या मैदानावर दोन्ही देशांतल्या क्रिकेटप्रेमी आणि देशप्रेमींचं लक्ष वेधलं गेलेलं आहे. आता देशप्रेमाचा हा (पोर)खेळ चांगला की वाईट हे तुम्हीच सांगा.

First published: September 19, 2018, 6:29 PM IST

ताज्या बातम्या