मिलिंद देवरा यांचा काँग्रेसला घरचा आहेर, चीन मुद्द्यावर केलं मोठं वक्तव्य
'जेव्हा चीनच्या अतिक्रमणाविरोधात राष्ट्रीय आवाज एकत्र झाला पाहिजे, त्याऐवजी राजकीय चिखल उधळला जात आहे. त्यामुळे आपण जगात एक तमाशा बनलो आहोत. चीनविरूद्ध एक होणं आवश्यक आहे.'
मुंबई, 28 जून : भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या वादामध्ये काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी त्यांच्या पार्टीला घरचा आहेर दिला आहे. यासंबंधी त्यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिलं की, 'एकजूट होऊन काम करण्याच्या काळात राजकीय कुरघोडीमुळे आपला जगात एक तमाशा बनला आहे.' देवरा म्हणाले की, चीनविरूद्ध संघटित होण्याची गरज आहे.
देवरा म्हणाले की, 'हे फार दुर्दैवी आहे की, जेव्हा चीनच्या अतिक्रमणाविरोधात राष्ट्रीय आवाज एकत्र झाला पाहिजे, त्याऐवजी राजकीय चिखल उधळला जात आहे. त्यामुळे आपण जगात एक तमाशा बनलो आहोत. चीनविरूद्ध एक होणं आवश्यक आहे.'
It’s highly unfortunate that the national discourse surrounding the surge in Chinese transgressions has deteriorated into political mud-slinging.
When we should be united in condemning China’s actions & seeking solutions, we are exposing our divisions
— Milind Deora मिलिंद देवरा (@milinddeora) June 27, 2020
दरम्यान, याआधीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही चीन प्रकरणावर काँग्रेसला सल्ला दिला होता. राष्ट्रीय सुरक्षेबाबत राजकारण करू नये असं त्यांनी म्हटलं होतं. 1962 मध्ये जे घडलं ते विसरता येणार नाही. आमच्या 45 हजार चौरस किमी क्षेत्रावर चीनने अतिक्रमण केलं होतं. पवार म्हणाले होते की, 'सध्या चीनने आपल्या कुठल्या भूमीवर कब्जा केला आहे की नाही हे मला ठाऊक नाही, परंतु त्याविषयी चर्चा करताना आम्हाला भूतकाळ लक्षात ठेवण्याची गरज आहे.'
शरद पवारांची ही प्रतिक्रिया काँग्रेस नेता राहुल गांधींच्या त्या आरोपांवर होती जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या आक्रमणामुळे भारतीय क्षेत्र त्यांच्या ताब्यात दिलं आहे असं म्हटलं होतं. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारात आपण अपयशी झालो असं म्हणणं घाई केल्यासारखं आहे. कारण यावेळी भारतीय जवान आपल्या जीवाची बाजी लावून गस्त घालत होते.