नवी दिल्ली, 11 एप्रिल: दिवसेंदिवस देशात कोरोना विषाणूची स्थिती (Corona Pandemic) भयानक बनत चालली आहे. देशात दररोज कोरोना विषाणूच्या नव्या रुग्णांची (Corona patients) असंख्य प्रकरणं समोर येत आहेत. शिवाय कोरोना रुग्णांचे मृत्यू होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. दरम्यान मागील 24 तासांत देशात एकूण 1,52,879 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 839 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर याच कालावधीत 90, 584 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात रुग्णांची वाढती संख्या पाहाता देशाच्या चिंता वाढल्या आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात कोरोना विषाणूची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या 1,33,58,805 वर पोहचली आहे. तर एकूण मृतांचा आकडा 1,69,275 वर गेला आहे. सध्या देशात एकूण 11,08,087 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर आतापर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,20,81,443 एवढी आहे. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) रविवारी दिलेल्या माहितीनुसार, 10 एप्रिलपर्यंत देशात 25.66 कोटीहून अधिक लोकांची कोरोना विषाणूची चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये शनिवारी एकूण 14,12,047 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.
(हे वाचा-कोरोनामुळे वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यास मुलाचा नकार, मुस्लीम तरुणाने दिला अग्नी)
त्यामुळे अलीकडे देशातील अनेक राज्यांत कोरोना लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार देशात लसीकरण मोहीम वेगवान व्हावी, या उद्देशानं 11 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान टीका उत्सव साजरा करण्यात येणार आहे. असं असलं तरी देशातील विविध राज्यांत कोरोना लशीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अवघे एक किंवा दोन दिवस पुरेल एवढाच लशीचा साठा विविध राज्यात उपलब्ध आहे. त्यामुळे एकिकडे लस उत्सव साजरा केला जात असला तरी देशात अनेकांना लशीपासून वंचित राहावं लागत आहे.
(हे वाचा- PHOTOS: पुण्यात सलग दुसऱ्या वीकेंड लॉकडाऊनचं काटेकोर पालन; गजबजणारे रस्ते पडले ओस)
महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणात लशी देण्याचं काम सुरू आहे. दरम्यान अनेक लसीकरण केंद्रावर लशीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद करावी लागत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणि राज्याची लोकसंख्या लक्षात घेऊन कोरोना लशीचं वाटप करावं, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.