नवी दिल्ली, 26 मे : 2020 मध्ये प्रत्येक 100 रस्ते अपघातात कमीत-कमी 36 लोकांचा मृत्यू झाला. हा आकडा मागील 20 वर्षातील सर्वाधिक आकडा आहे. बुधवारी रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक अहवाल जारी करुन ही आकडेवारी सांगितली.
सर्वाधिक मृत्यू दुचाकीस्वारांचा झाल्याचंही रस्त्यावरील मृत्यूंच्या आकडेवारीवरुन समोर आलं आहे. एकूण 43.5 टक्के लोकांचा दुचाकी चालवताना मृत्यू झाला. तसंच ट्रॅफिक सिग्नल तोडल्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत 79 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2020 मध्ये रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे मार्च 2020 पासून संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्याच्या होतं. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आलं. रस्ते सुनसान होते. पण तरीही 2020 या वर्षात रस्ते अपघातात जीव गमावणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. लोक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. वाहतुकीचे नियम बिनधास्त मोडत असल्याचं आकडेवारीवरुन दिसून येतं.
रिपोर्टनुसार, 2020 मध्ये टू-व्हीलर अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या 57,282 होती. 2019 मध्ये 44,666 लोकांचा मृत्यू हेल्मेट न घातल्याने झाला होता. तर 2020 मध्ये 39,589 लोकांचा हेल्मेट न घातल्याने मृत्यू झाला.
मृत्यू होणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या अधिक -
रिपोर्टमध्ये हेदेखील समोर आलं, की रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू तरुणांचे झाले आहेत. 2020 मध्ये 18-45 वयोगटातील जवळपास 77,500 लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. भारतातील एकूण रस्ते अपघातातील मृत्यूपैकी हे प्रमाण 69 टक्के होतं.
NCRB रिपोर्ट -
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, देशातील रस्ते वाहतूक मंत्रालय आणि राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो रस्ते अपघातांशी संबंधित वार्षिक आकडेवारी जाहीर करतात. NCRB ने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 2020 चा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये प्रत्येक 100 रस्ते अपघातांमध्ये 37 लोकांचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.