हवामान खात्यानं वर्तवला नवा अंदाज, असा असेल यंदाचा मान्सून

यंदाचा मान्सून समाधानकारक राहिल. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आज हवामान खात्यानं यंदाच्या मान्सूनचा पहिला अंदाज दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 15, 2019 03:35 PM IST

हवामान खात्यानं वर्तवला नवा अंदाज, असा असेल यंदाचा मान्सून

मुंबई, 15 एप्रिल : यंदा मान्सून सामान्य राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. यंदाचा मान्सून समाधानकारक राहिल. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आज हवामान खात्यानं यंदाच्या मान्सूनचा पहिला अंदाज दिला आहे.

मान्सून हूल देणार की वेळेत येणार?

काही दिवसांपूर्वी स्कायमेटच्या अंदाजानुसार देशात मान्सून सरासरीच्या 93 टक्के पडणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. भारतातील मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव असेल असाही अंदाज स्कायमेटनं वर्तवला होता. मात्र, हवामान विभागाने देशात यंदा चांगला मान्सून होणार असल्याचं म्हटलं होतं.

मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव कमी असू शकतो असंही सांगण्यात आलं होतं. हवामान विभागाच्या आतापर्यंतच्या अंदाजानुसार, 'अल निनोचा प्रभाव कमी असेल त्यामुळे यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त असेल अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात दिलासा मिळू शकतो.'

यंदा सरासरीच्या 95 ते 104 टक्के सामान्यत: मान्सून येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Loading...

मान्सून चांगला झाला तर त्याचा परिणाम कोणत्या गोष्टींवर होणार?

1.आर्थिक विकास चांगला होईल

2.शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

3.अनेक ग्रामीण भागांमध्ये पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

4.चांगला पाऊस झाला तर उत्पादन चांगलं येईल आणि शेतकऱ्यांना, छोट्या व्यापाऱ्यांना फायदा होईल.

5. महामाई कमी होण्याची शक्यता

6. शेअर बाजारावर होऊ शकतो परिणाम

7. पाऊस चांगला झाला तर त्याचा फायदा बँक आणि फायनान्शियल सेक्टरलाही होणार आहे.

8.शेतकऱ्यांना आवश्यक ती उपकरण, वस्तू, खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे स्कायमेट आणि आयएमडी या दोन्हीचे अंदाज अगदी वेगवेगळे आहेत. दरम्यान, उन्हाचे आणि पाणी टंचाईचे चटके बसलेला शेतकरी आणि जनता पावसाची आतूरतेनं वाट पाहत आहे.

मुंबईत तुरळक, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पावसाची शक्यता

जम्मू-काश्मीरकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर भारतात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार उत्तर आणि मध्य भारतात 15 एप्रिल रोजी अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे.

राजस्थानजवळील चक्रीय वात स्थितीमुळे महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दोन्हीचा परिणाम म्हणून राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईतही तुरळक पावसाची शक्यता आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ढगाळ वातावरण, जोरदार अवकाळी पाऊस, गारा पडणे अशा घटना घडत आहेत.

13 आणि १४ एप्रिल रोजी अंबरनाथ, नगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, नाशिकमधील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली होती. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तर शेतकऱ्यांना मात्र जोरदार फटका बसला आहे.

चिकू, आंब्याच्या बागांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. असाच अवकाळी पाऊस होत राहिला तर शेतकऱ्यांचा हातातोंडीशी आलेला घास जाण्याची शक्यता आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार...

- दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागात पावासाचा अंदाज

- उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसांच्या सरी.

- ढगांच्या गडगडाट, वादळी वाऱ्यासह मराठवाडा, विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज.

- 16 आणि 17 एप्रिल रोजी अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.

पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रात होणार पाऊस

गेल्या 2 दिवसापासून महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही ठिकाणी चांगला गारवा अनुभवायला मिळत असला तरी शेतकऱ्यांचं मात्र या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे.

त्यात आता पुढील दोन दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्नाटकाच्या किनारपट्टीवर झालेल्या हवामानामुळे वातावरणात बदल झाले असून पुढील दोन दिवस पाऊस होईल असं हवामान विभागाचे शास्त्रज्ञ विश्वंभर यांनी सांगितलं.

हवामानात बदल झाल्यामुळे तापमानात दोन डिग्री सेल्सिअसपर्यंत घट होवू शकते. मात्र, उकाडा कायम राहिल असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2019 03:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...