सावधान! हवामानात होणार बदल; पुढचे 4 दिवस पावसाचे

सावधान! हवामानात होणार बदल; पुढचे 4 दिवस पावसाचे

राज्याच्या काही भागात जोरदार वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होईल, असा इशाराही वेधशाळेनं दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 13 मे : राज्यात पुढचे चार दिवस वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. राज्याच्या काही भागात जोरदार वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होईल, असा इशाराही वेधशाळेनं दिला आहे.

मान्सूनचे वारे अंदमानच्या दिशेने आले आहेत. त्यामुळे आता देशाच्या काही भागात पूर्वमान्सूनच्या सरी कोसळायला लागल्या आहेत. त्याच वेळी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. याचा परिणाम म्हणून हवामान बदलत आहे.

भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. उद्या मराठवाडा आणि विदर्भात पावसाच्या हलक्या सरी बरसतील.

बंगालच्या उपसागरातल्या हालचालींबरोबर मध्य प्रदेशातही कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे बाष्पयुक्त वारे कर्नाटकच्या दिशेने वाहत आहेत. या सगळ्याचा एकत्र परिणाम म्हणजे जवळपास राज्यभरातलं हवामान पावसाळी होऊ शकतं. उन्हाचा तडाखा वाढलेला असताना आता राज्यात वादळी पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे.

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारपर्यंत म्हणजेच 16 मेपर्यंत दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटावर दाखल होण्याची शक्यता असल्याचं वेधशाळेनं म्हटलं आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून पावसाचं प्रमाण सामान्य राहील. 100 टक्के मोसमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

First published: May 13, 2020, 10:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या