विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी
मुंबई, 22 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान न केल्यास बँक खात्यामधून 350 रुपये वजा होणार असल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी हे खोटं असल्याचं समजलं पण हे खरं आहे असं म्हणून अनेकांनी ही बातमी इतरांनाही शेअर केली. पण या बातमी मागचं सत्य आता समोर आलं आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी मतदान न केल्यास बँक खात्यामधून 350 रुपये वजा होणार ही बातमी पूर्णतः चुकीची आहे. यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने अधिकृतरित्या कळवलं आहे. त्यामुळे अशा कोणत्याही अफवांमध्ये न अडकता त्यामगची सत्यता जाणून घ्या.
सध्या सोशल माध्यमांवर ही माहिती व्हायरल झाली असून ती तथ्यहीन आहे. एखाद्या व्यक्तिने मतदान न केल्यास त्याच्या खात्यातून पैसे वजा करण्याची बँकांना ताकीद देण्यात आल्याची माहितीही चुकीची आहे. तसंच बँक खाते नसलेल्या मतदारांकडून मोबाईल फोनचं रिचार्ज करताना 350 रुपये वसूल केले जाणार असल्याची माहितीही तथ्यहीन आहे.
नागरीकांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये, तसंच अशा बातम्या सोशल मीडियावर फॉरवर्ड करू नये, असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
खरंतर लोकशाही असल्यामुळे आपल्या प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे. त्यात प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य असल्य़ामुळे मतदान करण्याचा वा न करण्य़ाचा निर्णय हा सर्वस्वी तुमचा असेल. त्यासाठी कोणीही तुमच्याकडून रक्कम आकारू शकत नाही.
त्यामुळे भावनेच्या भरात अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. पण लोकशाही पद्धतीने प्रत्येकानं आपलं मत नोंदवावं आणि योग्य सरकार निवणून देण्यासाठी सहभाग करावा. त्यासाठी अशा कोणत्याही बाबींमध्ये पडू नये.
तथापी, मतदान करणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य असून मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक नागरीकाने लोकसभा निवडणुकीसाठी अवश्य मतदान करावे, असे आवाहनही या कार्यालयाने केले आहे.
VIDEO : मुलं मुलींकडे बघणार नाहीतर काय मुलांकडे बघणार? उदयनराजेंचं विद्यार्थिनीच्या प्रश्नावर उत्तर