सोलापूर, 18 नोव्हेंबर : राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थाबाबत आघाडी करण्याचा निर्णय होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत धोरणात्मक निर्णयही घेतले जातील असे सूचक विधान कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं आहे. सोलापूर शहरातील समस्यांसाठी त्यांनी आज जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. त्यावेळी पत्रकारांनी सोलापूर मनपातील सत्ताबदलाबाबत विचारले असता त्यांनी हे विधान केलं.
सोलापूरमध्ये सध्यस्थितीत भाजपची सत्ता आहे तर शिवसेना विरोधीपक्ष म्हणून कार्यरत आहे. जर राज्यात महाशिवआघाडी स्थापन झाली तर सोलापूर महापालिकेतही तसा प्रयोग होण्याची शक्यता आहे. भाजपचे सोलापूर महापालिकेत 49 नगरसेवक आहेत तर उर्वरीत विरोधी पक्षांकडे 53 संख्याबळ आहे. जर सर्व विरोधक एकत्र आले तर भाजपची सत्ता कोसळू शकते. त्यामुळेच राज्यातील आघाडीवरच सोलापूर मनपातील सत्तेची समीकरणे अवलंबून आहे. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जातं आहे.
एकीकडे सत्ता स्थापनेचा तिढा आहे तर दुसरीकडे राज्यातील सत्तेचा गोंधळ आता कुठे मिटेल असे वाटत असताना त्याला पुन्हा एकदा मोठा ब्रेक बसेल अशी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्रिपदावरून भाजप सोबतची युती तुटल्यानंतर शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा पर्याय निवडला. तिन्ही पक्षांच्या नेत्यांची सत्ता वापटासंदर्भात चर्चा सुरु आहे. राज्यातील शिवमहाआघाडीचे सरकार स्थापन होणार का यासंदर्भात आज (सोमवार) दिल्लीत शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात बैठक होणार आहे. आज दिल्लीत हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकार स्थापनेसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. पण पवारांनी दिलेल्या उत्तरामुळे राज्यातील सत्ता स्थापनेचा गोंधळ आणखी वाढणार असेच दिसत आहे.
राज्यातील सरकार स्थापने संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेनेलाच विचारा असे उत्तर शरद पवारांनी दिले. इतक नव्हे तर सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा सुरु आहे का याबद्दल विचारले असता पवार म्हणाले, कसली चर्चा, कोणाशी चर्चा. पवारांच्या या उत्तरामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे सरकार स्थापन होणार अशी चर्चा आहे. असे असताना पवारांनी मात्र असे काही सुरुच नसल्याचे म्हटले आहे. शिवसेना-भाजप यांनी एकत्र निवडणूक लढवली आहे. ते वेगळे आहेत आणि आम्ही व काँग्रेस वेगळे आहोत. त्यांनी त्यांचा मार्ग निवडायचा आम्ही आमचे राजकारण करू, असे पवार म्हणाले.
आज पवार आणि सोनिया गांधी यांची भेट होणार आहे. या भेटीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार आहे. ही चर्चा प्रामुख्याने शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासंदर्भात असू शकते असे समजते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा