नाशिक, 12 डिसेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) हे यूपीएचे अध्यक्ष (UPA) होतील अशी चर्चा रंगली होती. यावर पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सूचक विधान केले आहे. 'जर महाराष्ट्राचा नेते यूपीएचा अध्यक्ष झाला तर स्वागतच आहे' अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना राऊत यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.
'यूपीएचे नेतृत्व कोणी करावं ही चर्चा आहे. याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. शिवसेनाही यूपीएमध्ये नाही. शरद पवार यांचं नाव चर्चेत आहे. पण, त्यांनी याबद्दल नकार दिला आहे. पण, उद्या जर महाराष्ट्राचा नेता यूपीएचा अध्यक्ष झाला तर स्वागत आहे' असं राऊत म्हणाले.
महाराष्ट्राने आणखी एक सुपुत्र गमावला, मेजर सुरेश घुगे यांना वीरमरण
तसंच, भाजपला शिवसेनेची भीती कायम आहे. त्यामुळे ED, CBI यांनी भाजप कार्यकर्त्यासारखं वागू नये. माझ्याकडे भाजपच्या 120 लोकांची यादी आहे. ती यादी मी ईडीला पाठवणार आहे. राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे. ईडीने जी काही कारवाई सुरू केली आहे, त्याला उत्तर देण्यासाठी प्रताप सरनाईक समर्थ आहे, असंही राऊत म्हणाले.
'दिल्ली शेतकरी आंदोलकामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. या आंदोलनामध्ये फूट पाटण्याचे काम सुरू आहे. पण, या आंदोलनामध्ये कोणती फूट पडलेली नाही. देशातील वातावरण पेटले आहे. मोदी सरकारनं माघार घ्यावी हेच योग्य ठरणार आहे. लोकसभेत कायदा पुन्हा चर्चेत आणावा आणि शेतकऱ्यांना हवा तसा कायदा करावा, अशी मागणीही राऊत यांनी केली.
'नरसिंहराव पंतप्रधान झाले त्यावेळी खरंतर शरद पवार त्यावेळीच पंतप्रधान झाले असते. त्यांच्यावर अन्याय झाला आहे', असं मतही राऊत यांनी व्यक्त केले.
मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड सरकारनं ठरवला तर काय चुकलं ? आमचा घटनेवर विश्वास आहे. राज्यपालांना सरकारनं दिलेली नावं स्वीकारावी लागतील. राज्यपालांचा सरकारमध्ये हस्तक्षेप नाही, असंही राऊत म्हणाले.