प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी
नागपूर, 04 मे : नागपुरात पतीनं जेवनात शिळी पोळी दिल्यामुळे पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिळी पोळी दिल्यामुळे मनात राग धरून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पतीने रागात पत्नीवर रॉकेल ओतले. मात्र, शेजाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्यामुळे महिलेचा जीव वाचला. तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पतीविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सुनिल गोडमारे असं आरोपी पतीचं नाव आहे.
आरोपी प्रभाकर गोडमारे हा मोलमजुरी करतो. त्याला दारूचं व्यसन आहे. त्यात पत्नीचे कोणा युवकाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय प्रभाकरला होता. त्यामुळ तो कोणत्याही कारणावरून पत्नीशी वाद घालून मारहाण करीत होता.
शुक्रवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास प्रभाकर दारू पिऊन घरी आला. त्यानं पत्नीला जेवन वाढायला सांगितलं. स्वयंपाक झाला नसल्यानं तिने थोडं थांबायला सांगितलं. मात्र, त्यानं शिवीगाळ करीत लगेच जेवन वाढून मागितलं. त्यामुळे मिनाक्षी यांनी सकाळची शिळी पोळी प्रभाकरला दिली.
'शिळी पोळी का दिली?' या कारणावरून प्रभाकरनं तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. शेजारच्या एका युवकासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करीत तिला बेडरूममध्ये ओढत नेलं. तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, त्याच्या आईनं आरडाओरड केली. त्यामुळे वस्तीतील युवकांनी घराकडे धाव घेतली आणि तिला प्रभाकरच्या तावडीतून वाचविलं. लगेच पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. त्यांनी प्रभाकरविरूद्ध पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
VIDEO : ते 50 लाख कुणाचे पकडले गेले? चंद्रकांत खैरेंचा दानवेंना सवाल