भिवंडीतील कशेळी येथे सापडल्या ऐतिहासिक तोफा; शिवप्रेमींमध्ये उत्साह 

भिवंडीतील कशेळी येथे सापडल्या ऐतिहासिक तोफा; शिवप्रेमींमध्ये उत्साह 

या तोफा मिळाल्यानंतर तालुक्यातील शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं आहे.

  • Share this:

भिवंडी, 4 नोव्हेंबर : भिवंडी ठाणे मार्गावर असलेल्या कशेळी गावातील मैदानात दोन ऐतिहासिक तोफा रविवारी सापडल्या आहेत. या तोफांमुळे भिवंडीतील इतर गावांप्रमाणेच आता कशेळी गावाला देखील ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. या तोफा मिळाल्यानंतर तालुक्यातील शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं आहे.

भिवंडी तालुक्यातील शिवप्रेमी व इतिहास अभ्यासक जयकांत शिक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शिवज्योत संघटनेचे अध्यक्ष रोशन प्रकाश पाटील, पप्पू पाटील, शुभंकर पाटील, उदय पाटील हे तरुण एकत्र येत त्यांनी शिवज्योत परिवार महाराष्ट्र राज्य ही संघटना स्थापन केली आहे. आज या संघटनेचे 80 पेक्षा अधिक सभासद आहेत. शिवकालीन गडकिल्ल्यांच्या इतिहास तरुणांसह नागरिकांना माहीत व्हावा तसेच ऐतिहासिक गडकिल्ल्यांची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी ही संघटना काम करते . 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमाखातर शिवज्योत संघटनेचे तरुण जिल्ह्यासह राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहेत. भिवंडीतील कशेळी येथील मैदानाच्या मोकळ्या जागेत ऐतिहासिक तोफा असल्याची माहिती इतिहास अभ्यासक जयकांत शिक्रे यांच्या अभ्यासात तसेच रोशन पाटील यांना चर्चेतून माहिती मिळाली होती. 

शिवज्योतच्या सभासदांनी मागील पंधरा दिवसांपासून कशेळी येथे ऐतिहासिक वस्तूंचा शोध घेण्यास सुरुवात केली असता रविवारी कशेळी येथील छ. शिवाजी महाराज क्रीडांगण येथे असलेल्या दत्त मंदिर व स्मशान भूमीच्या बाजूला सुरुवातीला एक तोफा आढळली. शिवज्योतच्या सभासदांनी अगोदर स्वतःच्या हातांनी व श्रमदानाने ही तोफ बाहेर काढण्यासाठी सकाळी आठ वाजल्या पासून सुरुवात केली होती.

हे खोदकाम करताना शिवज्योतच्या सर्वच सभासदांच्या हाताला अक्षरशः फोड आले होते. दरम्यान तोफा मोठ्या व मातीत खोलवर असल्याने शेवटी जेसीबी मशीनच्या साहाय्याने दोन तोफा बाहेर काढण्यात आल्या आहेत. तोफा बाहेर निघताच शिवप्रेमींनी एकच जल्लोष साजरा केला.

या तोफा ब्रिटिश कालीन असून तोफांवर 1798 ते 1811असा उल्लेख असून तोफांवर ब्रिटिश राजमुकुट असल्याने या ब्रिटिश कालीन ताफा असाव्यात, असा अंदाज बांधण्यात येत आहे. या तोफांची लांबी 9 फूट 2 इंच व दुसऱ्या तोफेची लांबी 9 फूट 3 इंच आहे. त्यामुळे तोफांची लांबी आणि त्यावरील ब्रिटिशकालीन नोंद यामुळे या तोफा ब्रिटिशकालीन असाव्यात तसेच या ठिकाणी आणखी चार तोफा अजून आहेत असा अंदाज शिवज्योतचे मार्गदर्शक व इतिहास अभ्यासक जयकांत शिक्रे यांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केला आहे. 

गावातील लोक पुरातन खांब म्हणून या तोफांचा उल्लेख करत होते. मात्र हे लोखंडी खांब इतिहासाचे पुरावे असल्याची खात्री पटल्यानंतर शिक्रे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शोध मोहीम सुरू केली असता या तोफा मिळाल्या ज्याचा आम्हाला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया शिवज्योत परिवार संघटनेचे अध्यक्ष रोशन पाटील यांनी दिली आहे. 

Published by: Akshay Shitole
First published: November 4, 2020, 11:44 PM IST
Tags: Bhiwandi

ताज्या बातम्या