सागर सुरवसे, (प्रतिनिधी)
सोलापूर,16 मे- त्याला लोक अतिकाटकसरी म्हणून हिणवयाचे. मात्र त्याने दुर्लक्ष करत आपल्या परीने जीवन जगणारा सीताराम आता गावासाठी जणू 'दशरथ मांझी' ठरलाय. स्वखर्चातून गावासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी हतबल ठरलेल्या लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचं काम सोलापुरातल्या कोंडी गावातल्या एका शेतकऱ्याने केलं आहे. त्याच्याही प्रयत्नांला खो घालण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र गावातील ज्येष्ठांच्या मदतीने त्याने आपलं काम तडीस नेलय. यासाठी त्याच्या आईच्या पाटल्या विकायलाही त्याने मागेपुढे पहिले नाही.
राज्यात यंदा झालेल्या अत्यल्प पावसामुळे गावागावात पाणीबाणी सुरु झालीय. नदी, नाले, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. गावातील कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे गावागावातील सार्वजनिक पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम झालाय. पाण्याचं दुर्भिक्ष सर्वत्रच जाणवत आहे. सरकारनं दुष्काळी तालुक्याची यादी जाहीर केलीय. तिथे आज ना उद्या सरकारी यंत्रणेकडून व्यवस्था होईलही, मात्र ज्या तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेशच नाही. अशा तालुक्यातील गावांची अवस्था मात्र बिकट होणार आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी हे 3000 लोकसंख्येचं गाव. कोंडी गाव ज्या उत्तर सोलापूर तालुक्यात येते त्या तालुक्याचा समावेश दुष्काळी यादीत नाहीय. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी कसे मिळणार हि चिंता ग्रामस्थांना सतावत असतानाच या गावकऱ्यांसाठी याच गावचे 45 वर्षीय सीताराम पाटील भगीरथासारखे धावून आलेत. दोन अडीच एकर जमिनीत फुलशेतीसह हार विक्री आणि गावोगाव फिरुन सीमकार्ड विक्री करणारे सीताराम पाटील गावच्या दृष्टीने तसे कंजूष माणूस. मात्र, याच कंजूष माणसाने गावचा पाणीप्रश्न सोडवलाय. तो ही चक्क आईचे दागिने विकून.
यंदाच्या वर्षी राज्यभर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. पाऊस न झाल्याने तलाव कोरडे पडले. कोंडी गावातही हीच स्थिती होती. त्यामुळे तलाव भरण्यासाठी दीड किलोमीटर अंतरावरील उजनी कालव्यातून पाणी आणण्याची संकल्पना सीताराम पाटील यांनी मांडली होती. त्यासाठी लोकवर्गणी करणार असल्याचं सांगून एक लाख रुपये गावासाठी देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. मात्र, गावपुढाऱ्यांची साथ काही लाभली नाही. उलट त्याचा हा विषय हसण्यावर घेतला गेला. मात्र, सीताराम पाटील यांनी निराश न होता त्यांनी जलवाहिनी टाकण्याचा चंग बांधला. त्याला जयराम भोसले, जालिंदर भोसले, तुलसीदास भोसले आणि सदाशिव गायकवाड या ज्येष्ठांची साथ मिळाली. लोकवर्गणी जमवण्याच्या प्रयत्नाला स्थानिक राजकारण्यांनी खो घातला होता. श्रेय मिळणार नसल्याने गाव पुढाऱ्यांनी त्याला हिणवणं सुरूच ठेवलं. गावातील काही ज्येष्ठ मंडळींनी आर्थिक मदतही केली. तरी पैशाची चणचण जास्त जाणवू लागल्याने सीताराम पाटील यांनी चक्क आई मंदोदरी यांच्या सोन्याच्या पाटल्या विकून जलवाहिनीचं काम पूर्ण केलं.
लोकांनी हिणवले तरी गावासाठी पाणी आणण्याची खूणगाठ बांधलेल्या सीताराम पाटील यांनी ते काम पूर्ण केले. कालवा ते तलाव हे अंतर साडेचार हजार फूट असून यासाठी चार इंच व्यासाच्या दोन जलवाहिनी त्यांनी टाकल्या. यासाठी आठ ते दहा लाख रुपये खर्च झाला. ही योजना कार्यान्वित झाल्याने गावातील 3000 लोकांना आणि 700 जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
आपल्या परीने प्रयत्न न करता प्रत्येक वेळेस सरकारी यंत्रणेवर दोष देणाऱ्या लोकांची आज काही कमतरता नाही. अशा लोकांसाठी सीताराम पाटील हे उत्तम उदाहरण आहे. सीताराम पाटलांच्या प्रयत्नामुळेच गावाची पाणीटंचाई दूर झाली. त्यांच्या या दात्रूत्वाला आणि उदार मनानं पोराच्या प्रयत्नाला हातातील पाटल्या काढून देणाऱ्या त्या मातेला सलामच...सीताराम यांच्या या कार्यामुळे संत तुकारामांच्या अभंगातील ओळी आठवतात. 'वेडा झालो, वेडा झालो..वेडियाच्या गावा गेलो..आता आम्हा विचारु नका काही कारण, आम्ही माणसात नाही...आम्ही माणसात नाही...' असंच म्हणावं लागेल.
500 च्या नोटांचे का पडताय तुकडे, काय आहे सत्य?