Home /News /news /

काका पवारांच्या तालमीतील दोन्ही पैलवान 'महाराष्ट्र केसरी कितबा'च्या आखाड्यात आमनेसामने

काका पवारांच्या तालमीतील दोन्ही पैलवान 'महाराष्ट्र केसरी कितबा'च्या आखाड्यात आमनेसामने

अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या तालमीतील मल्ल हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके उद्या महाराष्ट्र केसरी किताबच्या आखाड्यात आमनेसामने उतरणार आहेत.

पुणे, 6 जानेवारी : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरा तर्फे म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित 63व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या खुल्या गटाची अंतिम लढत आज मोठ्या चुरसीच्या वातावरणात पार पडली. गादी व माती अशा दोन्ही विभागातून अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या तालमीतील मल्ल हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके उद्या महाराष्ट्र केसरी किताबच्या आखाड्यात आमनेसामने उतरणार आहेत. महाराष्ट्र केसरी खुला गट माती विभागातील अंतिम फेरीत तुल्यबळ, अतीतटीची, रोमहर्षक, चुरसीची अशा अनेक विशेषणांनी पार पडली. निर्धारित वेळेच्या शेवटच्या 4 सेकंदातही अंतिम विजेता कोण याविषयी संभ्रम निर्माण करत ‘काटे की टक्कर’ देत लातूरचा शैलेश शेळके व सोलापूरचा ज्ञानेश्वर जमदाडे यांची लढत झाली. शैलेशने ज्ञानेश्वरवर 11-10 अशा अतीतटीच्या गुणसंख्येने विजय मिळविला व मानाच्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम लढतीत जागा निश्चित केली. नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीरने मागील महाराष्ट्र केसरी पुणे शहराचा अभिजीत कटकेला 5-2 गुणांनी पराजित केलं. त्यामुळे ही आजच्या दिवसातील विशेष लक्षवेधी लढत ठरली. तोडीस तोड चपळ लढत देत अखेर हर्षवर्धनने महाराष्ट्र केसरी किताबच्या लढतीस सज्ज झाला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत काका पवार म्हणाले, “दोन्हीही मल्ल माझ्यात तालमीत तयार झाले आहेत. दोघेही ग्रीको रोमन कुस्ती खेळून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व जागतिक खेळाडू झाले आहेत. मात्र महाराष्ट्र केसरी कितबासाठी दोघेही प्रथमच खेळत आहेत. ते तगडे पहिलवान आहेत याचा मला विश्वास होताच म्हणूनच दोघांनाही वेगवेगळ्या विभागातून मैदानात उतरविले. त्यांनी केलेल्या मेहनतीचे त्यांना फळ मिळाले. दोघेही माझेच पठ्ठे असल्याने घरात गुण्यागोविंदाने राहायचे मात्र गादीवर प्रतिस्पर्धी म्हणूनच राहायचं हे संगितले आहे. विजयी कोणीही झाला तरी मला आनंदच असणार आहे. गेली कित्येक वर्ष आमच्या तालमीचे पहिलवान महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत जात होते. मात्र विजयाने आजवर आम्हाला हुलकावणी दिली. यंदा मात्र महाराष्ट्र केसरी आमचाच होणार यावर शिक्का मोर्तब झाले आहे, याचा आम्हाला विशेष आनंद आहे.” शैलेश शेळके म्हणाला की, “मी गेले अनेक वर्षे काकांच्या तालमीत तयार झालो आहे. आर्थिक परिस्थितीमुळे लष्करात भरती झालो. पण कुस्ती मात्र कधीही सोडली नाही. उद्याच्या कुस्तीसाठी मानसिक तयारीच महत्वाची आहे. उद्या मी डोक्याने खेळ करणार आहे. किताबच्या शर्यतीत पोहचेन याचा आत्मविश्वास मला होता.” हर्षवर्धन म्हणाला की, “उद्याची कुस्ती गादीवर असून मी गेले सहा महीने गादीच्या कुस्तीचा सराव करत आहे. आम्ही दोघे एकमेकांचा खेळ जाणतो. त्यामुळे उद्या जो जास्त चांगली कुस्ती खेळेल तोच विजयी होईल.” उपांत्य फेर्‍यांमधील थरार 2018चा महाराष्ट्र केसरी बालारफिक शेखला चितपट करत ज्ञानेश्वर जमदाडेची घोडदौड. महाराष्ट्र केसरी खुला गटाच्या माती विभागातील उपांत्य फेरीत ज्ञानेश्वर उर्फ माऊली जमदाडे व गतवर्षीच्या महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख यांच्यात चुरसीची लढत झाली होती. अपेक्षेप्रमाणे बालारफिकने लीड घेतली होती. पण त्याला तोडीस तोड टक्कर देत माऊलीने एका मिनिटाच्या आत त्याला चितपट करून बाजी मारली व माती विभागातील अंतिम सामन्यात प्रवेश केला. तसेच लातूरच्या शैलेश शेळकेने हिंगोलीच्या गणेश जगतापवर 6-4 गुण फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. पुणे शहराचा अभिजीत कटके व लातूरचा सागर बिराजदार यांच्यात महाराष्ट्र केसरी गादी विभागासाठी चित्त थरारक तुल्यबळ लढत झाली. यात अभिजीतने सागरवर 2-0 गुणांनी विजय मिळवत गादी विभागातील अंतिम फेरीत प्रवेश केला. तर नाशिक जिल्हयाच्या हर्षवर्धन सदगीरने मुंबई उपनगरच्या सचिन येलवार 6-0ने हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला. उद्या महाराष्ट्र केसरी किताबच्या लढतीचा कार्यक्रम सायंकाळी 5 वाजल्यापासून सुरू होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार उपस्थित राहणार आहेत. पार्किंगची व्यवस्था हायवे वरील हॉटेल हॉलिडे इनच्या जवळील मैदानवर करण्यात आली आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Maharashta kesri

पुढील बातम्या