18 डिसेंबर, अहमदाबाद : गुजरातमध्ये पैसा आणि ईव्हीएम टॅम्परिंग करून जिंकणाऱ्या भाजपला हार्दिक सुभेच्छा, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया हार्दिक पटेलनं गुजरात निकालांनंतर दिलीय. तसंच यापुढेही गुजरातमध्ये कर्जमाफी आणि पाटीदारांचं अनामत आंदोलन सुरूच राहणार, असंही हार्दिक पटेलनं म्हटलंय. सुरत, राजकोटमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणावर ईव्हिएम टॅम्परिंग केल्याचा आरोपही हार्दिक पटेलनं केलाय. गुजरातची जनता आता कुठे जागृत झाली असून, गुजराती मतदारांनी आणखी जागृत होण्याची गरज आहे, असंही हार्दिक पटेलनं म्हटलंय.
गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेलनं पाटीदारांचं आरक्षण आंदोलन उभारून भाजपच्या विरोधात मोठं रान पेटवलं होतं. किंबहुना काँग्रेसच्या यशामध्ये हार्दिकचा अप्रत्यक्षपणे निश्चितच मोठा वाटा असल्याचं मानलं जातंय. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवानी या तीन युवा चेहऱ्यांनी गुजरातमध्ये भाजपसमोर कडवं आव्हान उभं केलं होतं पण मोदींनी सरतेशेवटी भाजपला गुजरातमध्ये जिंकून दिलंच आहे तरीही आमची भाजप सरकारविरोधातली लढाई सुरूच राहणार असल्याचं हार्दिक पटेलनं म्हटलंय.