19 नोव्हेंबर, नवी दिल्ली : गुजरात विधानसभेसाठी काँग्रेसने 77 उमेदवारांची पहिली यादी अखेर अधिकृतरित्या प्रसिद्ध केलीय. या पहिल्या यादीत पाटीदार समाजाच्या 20 उमेदवारांनी स्थान देण्यात आलंय. यावरून काँग्रेस आणि हार्दिक पटेल यांच्या पाटीदार आंदोलक समितीच्या निवडपूर्व युतीची आता फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी आहे, असंच म्हणावं लागेल. काँग्रेसच्या पहिल्या यादीत शक्तीसिंह गोहिल यांना आवर्जून स्थान देण्यात आलंय. यावेळी ते अवडसा ऐवजी माडवी मतदारसंघातून लढणार आहेत.
शक्तीसिंह गोहिल हे काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जातात. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भारतसिंह सोळंकी यांनी यावेळी निवडणूक लढवणार नसल्याचं यापूर्वीच जाहीर केलंय. प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रचारासाठी पुरेसा वेळ द्यावा लागणार असल्याचं आपण यावेळी स्वतःहून माघार घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, भाजपने मात्र, यापूर्वीच त्यांच्या दोन उमेदवार याद्या जाहीर केल्यात. 106 उमेदवारांच्या या दोन याद्यांमध्ये भाजपने प्रथमच बऱ्याच विद्यमान आमदारांना घरी बसवून नव्या दमाच्या उमेदवारांना संधी देण्यात आलीय. त्यामुळे तिकीट कापलेल्या बऱ्याच भाजप आमदारांनी बंडखोरीची तयारी चालवलीय.