गुवाहाटी, 10 नोव्हेंबर : वाढीव जीएसटीवरून सरकारविरोधात वाढत चाललेली ग्राहकवर्गातली नाराजी कमी सरकारने तब्बल 177 गृहपयोगी वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून थेट 18 टक्क्यांपर्यंत खाली आणलाय. त्यामुळे 28 टक्के जीएसटी आकारला जाणाऱ्या वस्तूंची संख्या आता थेट 50 पन्नासपर्यंत कमी झालीय. आज गुवाहाटीत भरलेल्या जीएसटी कौन्सिलमध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय.
या निर्णयामुळे च्युगम, टूथपेस्ट, चॉकलेट, सौंदर्य प्रसाधने, दाढीचे सामान,शॅम्पू, कपडा डिटर्जंट पावडर यांच्यासह ग्रॅनाइट आणि मार्बल यासारख्या वस्तूही स्वस्त होणार आहेत. त्यामुळे आता केवळ 50 लग्झरी प्रॉडक्टच 28 टक्के श्रेणीत राहतील. फाईव्ह स्टार हॉटेल वगळता इतर एसी रेस्टॉरंटमध्येही जीएसटीचा दर 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलाय. परिणामी मध्यमवर्गाचं हॉटेलिंग बऱ्यापैकी स्वस्त होणार आहे.
1 जुलै 2017 पासून लागू झालेल्या जीएसटीचे सध्या 0.25%, 3%, 5%, 12%, 18% आणि 28% असे एकूण सहा स्लॅब आहेत. यामध्ये सर्वात जास्त स्लॅब हा 28 टक्क्यांचा आहे. दरम्यान, जीएसटीच्या पहिल्या तीन महिन्यातच सरकारी तिजोरीत एकूण 2.78 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. पण आजच्या निर्णयामुळे जीएसटीच्या वार्षिक उत्पन्नात 20 हजार कोटींची घट होणार आहे.
काय स्वस्त होणार ?
या निर्णयामुळे सॅनिटरी नॅपकीन, सूटकेस, वॉलपेपर्स, प्लायवूड, लेखन साहित्य, घड्याळ, खेळणी, आफ्टर शेव, डिओड्रंट, वॉशिंग पावडर, ग्रॅनाईट आणि मार्बल यांसारखी अनेक उत्पादनं आता 18 टक्क्यांच्या श्रेणीत येतात.
या वस्तूंवरील जीएसटीत कपात नाहीच !
तर रंग, सिमेंट, वॉशिंग मशिन, फ्रीज आणि तंबाखू यांसारख्या उत्पादनांना तेवढीच किंमत मोजावी लागेल, असं म्हटलं जात आहे.
बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी हे जीएसटी नेटवर्कच्या गटाचे प्रमुख आहेत. आतापर्यंत जीएसटी काऊन्सिलच्या 22 बैठका झाल्या आहेत. गुवाहाटीत आज पार पडलेली ही 23वी बैठक होती. पेट्रोलियम पदार्थांचा जीएसटीत समावेश करण्याबाबत मात्र, या बैठकीत कोणताच निर्णय होऊ शकला नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा