कोल्हापूर, २४ जानेवारी २०१९- पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयीत अमित देगवेकरला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बुधवारी त्याला कसबा बावडा येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. पिस्तुल चालवण्याचं ट्रेनिंग झाल्यावर बेळगाव बस स्थानकावर वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे यांची बैठक झाली. या बैठकीला अमित देगवेकर ही उपस्थित होता. कोल्हापूरमधील सीसीटीव्ही तपासण्याचं काम देगवेकर यानं केलं होतं. देगवेकरनं ही माहिती दिल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच कॉम्रेड गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणीदेखील अमित संशयीत आरोपी आहे. आतापर्यंत पानसरे हत्या प्रकरणातील अमित देगवेकर हा आठवा आरोपी आहे.
सुनावणीदरम्यान, आरोपीच्या वतीने समीर पटवर्धन यांनी युक्तीवाद केला. तर देगवेकरला सहा दिवसांच्या कोठडीची मागणी सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी केली. अखेर न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अमित याच्यावर पानसरे हत्ये प्रकरणात शस्त्र पुरवणं, बेळगाव इथे झालेल्या बैठकीत उपस्थित राहणं, बेळगाव परिसरात झालेल्या बॉम्बस्फोट प्रशिक्षण आणि गोळीबाराच्यावेळी प्रत्यक्ष उपस्थित असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
दरम्यान, पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात'सनातन प्रभात'चे माजी संपादक शशिकांत राणे यांचं नाव समोर आलं आहे. एसआयटीच्या पुरवणी दोषारोपपत्रमध्ये राणे यांचं नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कर्नाटक एसआयटीने या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केलं. शशिकांत राणे यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येसाठी पैसे पुरवल्याचा आरोप एसआयटीने केला होता. गौरी लंकेश प्रकरणात आरोपी अमित देगवेकर याच्या जबाबवरून राणे यांचे नाव उघड झालं होतं. काका नावाने राणे यांना ओळखलं जायचं असं अमितने याआधीच चौकशीत कबूल केलं आहे.
Special Report : बाळासाहेब नावाचा झंझावात; काही गाजलेली भाषणं...