धुळे, 25 आॅगस्ट : जळगाव महानगरपालिका निवडणुकीतील घवघवीत यशानंतर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच भाजपमध्ये वजन वाढलं आहे. येणाऱ्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या धुळे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची धुरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश स्तरावरील प्रमुख नेत्यांनी गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली आहेत.
सध्या धुळे पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची तर जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि आमदार अनिल गोटे यांच्यात राजकीय कलह सुरू असल्याचे सर्वश्रुत आहे. पक्षाआंतर्गत सुरु असलेले गतातटाचे राजकारण पक्षासाठी डोकेदुखी ठरू लागले आहे.
त्यात महापालिका निवडणुकीचे नेतृत्व कुणी करावे? यावरून गोटे आणि भामरे यांच्यात उघड वाद सुरू असताना मुख्यमंत्र्यांसह भाजपने प्रदेशस्तरावरून मंत्री गिरीश महाजन यांची प्रभारीपदी नियुक्ती करत त्यांच्या हाती धुळे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची सूत्रे सोपविली.
त्यामुळे भाजपमधील स्थानिक नेत्यांमधील तीव्र संघर्षावर रामबाण उपाय करण्याचे आव्हान वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांवर यांच्यासमोर राहील. तर दुसरीकडे मंत्री महाजनांच्या या नियुक्तीमुळे भाजपमधील गटाततासह प्रमुख पक्षांमध्ये अस्वस्था पसरली आहे.
विशेष म्हणजे, जळगाव महापालिका निवडणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री आणि यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारलेत. निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेतून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना बाजूला ठेऊन महाजानांनी भाजपचं जळगावात 'कमळ' फुलवून दाखवलंय. जळगाव महापालिकेचा सत्ता काबिज करताना महाजनांनी आपले पूर्वाश्रमीचे राजकीय गुरू सुरेशदादा जैन यांनाही जोरदार धक्का देत चांगलाच धोबीपछाड दिलाय. महाजनांच्या या विजयामुळे खडसेंची अस्वस्था वाढलीये.
जळगाव महापालिका निवडणुकीत गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने निर्विवाद सत्ता मिळवली. या निकालामुळे जळगावातील सुरेश जैनांचं राजकीय साम्राज्य एकाच दणक्यात खालसा झालंय. या निवडणुकीत सुरेश जैनांनी प्रथमच आघाडीचा सवतासुभा बाजुला ठेऊन शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुका लढल्या तरीही तरीही त्याचा त्यांना काहीच राजकीय फायदा झाला नाही. बरेच दिवस जेलमध्ये राहिल्याने त्यांना जळगावकरांची सहानुभूती मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. पण झालं उलटचं, गिरीश महाजनांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देऊन प्रथमच महापालिकेची सत्ता काबीज केल्याच जमा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Girish mhajan