मावळमध्ये अजित पवारांची खेळी, गिरीश बापटांची निवडणूक आयोगाकडे धाव

मावळमध्ये अजित पवारांची खेळी, गिरीश बापटांची  निवडणूक आयोगाकडे धाव

मावळ लोकसभा मतदारसंघात आपली ताकत दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाहेरील नेते मंडळी आणि कार्यकर्ते मुक्कामासाठी दाखल झाले आहेत.

  • Share this:

गोविंद वाकडे, प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड, 26 एप्रिल : 'मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्वतःचे नेते आणि कार्यकर्ते राहिले नाहीत. म्हणूनच अजित पवार बाहेरील नेते आणि कार्यकर्ते आणून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

बाहेरच्या कार्यकर्त्यांचा फापट पसारा आणून काही जास्त साध्य होत नाही. त्यामुळे बाहेरचे कार्यकर्ते आणून राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी चिंचवडमध्ये मतदारांमध्ये दहशत निर्माण करण्याच काम करू नये, अशी टीका गिरीष बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात आपली ताकत दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाहेरील नेते मंडळी आणि कार्यकर्ते मुक्कामासाठी दाखल झाले आहेत. या नेते आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस मतदारांमध्ये दहशत निर्माण करू शकते म्हणून या नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांना मतदानाच्या 24 तासापूर्वी मावळ लोकसभा मतदारसंघापासून बाहेर ठेवण्यात यावं अशी मागणीही गिरीष बापट यांनी निवणूक आयोगाकडे लेखी तक्रार देऊन केली आहे.

मावळमधील राजकीय स्थिती

मावळमधून शिवसेनेकडून पुन्हा एकदा श्रीरंग बारणे यांनाच उमेदवारी दिली आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी आपला जनसंपर्क वाढवण्यावर विशेष भर दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. पण ही लढाई आता श्रीरंग बारणे यांच्यासाठी सोपी असणार नाही. कारण पार्थ पवार यांच्या रूपाने या मतदारसंघात राष्ट्रवादी तुल्यबळ उमेदवार उतरवला आहे. तसंच शेकापच्या जयंत पाटील यांनीही पार्थ पवार यांच्या उमेवारीला पाठिंबा दिला आहे. फक्त पाठिंबाच नव्हे तर पार्थ यांना उमेदवारी द्यावी, यासाठी जयंत पाटील यांनी शरद पवारांकडे गळदेखील घातली होती. त्यामुळे या मतदारसंघातून शेकाप आपली संपूर्ण ताकद राष्ट्रवादीच्या मागे लावणार आहे.

अशावेळी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना राष्ट्रवादीकडून जोरदार टक्कर दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मावळमधील लढत चुरशीची ठरणार आहे.

==================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 05:41 PM IST

ताज्या बातम्या