Home /News /news /

‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ :  पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ :  पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

मुंबई आणि पुण्याचा गणेशोत्सव सर्व भारतात प्रसिद्ध आहे. या दोन शहरातल्या काही प्रसिद्ध मंडळांच्या तयारीच्या 'स्पेशल स्टोरी'ज आम्ही घेऊन येतोय खास तुमच्यासाठी. आज आहे पुण्याचं वैभव श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती.

आयटी हब, ऑटोमोबाईल हब, शिक्षण,  संस्कृती, कला या गोष्टींमुळे पुणे जगात ओळखलं जातं. या गोष्टींसोबतच पुण्याची आणखी एक ओळख आहे आणि ती म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग झालाय. याच पुण्यात लोकमान्य टिळकांनी घरातला गणपती बाहेर आणला आणि त्याला उत्सवाचं रूप दिलं. हा उत्सव आता महाराष्ट्राची ओळख बनलाय. पुणे म्हटलं की गणेशोत्सव आणि पुण्यातला गणेशोत्सव म्हटलं की डोळ्यासमोर एकच नाव येतं आणि ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. इथं श्रीमंती फक्त नावातच नाही तर ती मंडळाच्या प्रत्यक्ष कामातही आहे आणि दिसण्यातही आहे. दगडूशेठ मंडळाचं प्रत्येक काम भव्य-दिव्य आणि उच्च प्रतिचं. बाप्पांच्या सर्वांगसुंदर मूर्तीसमोर नतमस्तक होणारा प्रत्येक जण क्षणभर आपलं दु:ख विसरून जातो. भव्य देखावे, आकर्षक रोषणाई, प्रत्येक कामाला विधायकतेची जोड असते. मंदिरं ही फक्त देवालयं न राहता मानवतेची मंदिरं बनावी हा विचार प्रत्यक्षात आणण्याचं काम हे मंडळ गेली अनेक दशकं करत आहे. ‘महाउत्सवा’ची महातयारी दगडूशेठच्या उत्सवाचं रूप आता महाउत्सवाचं झालं आहे. आणि त्याची तयारीही तशीच असते. उत्सवाच्या काळात गाभाऱ्यातून आपल्या लाडक्या भक्तांसाठी उत्सव मंडपात येणारा दगडूशेठ हा कदाचित जगातला पहिलाच देव असावा. पुण्यातल्या गजबजलेल्या लक्ष्मी रोडवर असलेलं श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं मंदिर हे पुण्याचं आराध्य दैवत आहे. वर्षभर तिथे भाविकांची रिघ असतेच. गणेशोत्सवाच्या काळात तर गर्दीचे सर्व विक्रम मोडले जातात. त्यामुळं मंडळाकडे सर्व वर्षभरच कार्यक्रमांची रेलचेल असते. पण उत्सवाच्या या 10 दिवसांची तयारी सुरू होते ती तब्बल 5 महिने आधीपासून. मंडळाची बैठक होऊन त्यात गणेशोत्सवाचा आराखडा तयार केला जातो आणि नंतर कामांची विभागणी होते. मंडळाकडे एक हजार कार्यकर्ते असून उत्सवाच्या काळात ते दिवस-रात्र एक करतात. बाप्पांच्या प्रेमाखातर निरपेक्ष भावनेने काम करणारे कार्यकर्ते ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची खरी श्रीमंती आहे असं ट्रस्ट चे अध्यक्ष अशोक गोडसे अभिमानाने सांगतात. प्राचीन मंदिरांचे भव्य देखावे हे आकर्षण भारतातल्या प्राचीन मंदिराचे देखावे उभारणं हे या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. ज्या लोकांना दूरवरच्या तीर्थक्षेत्राला जाणं होत नाही त्या लोकांना ती मंदिंर बघायला मिळावीत हा मंडळाचा उद्देश आहे. यावर्षी प्रसिद्ध राजराजेश्वर मंदिराची प्रतिकृती उभारली जातेय. प्रसिद्ध कलाकार विवेक खटावर गेल्या अनेक वर्षांपासून हा देखावा साकारण्याचं काम करत असतात. ही प्रतिकृती आणि त्यावरची रोषणाई ही एवढी देखणी असते की पाहणाऱ्याला आपण प्रत्यक्ष त्या मंदिरातच आहोत असा भास होतो. गणपतीची स्थापना झाल्यावर त्याच दिवशी रात्री 7 वाजता दगडूशेठ गणपतीची रोषणाई सुरू होते. भाविक अगदी पहिल्या दिवसांपासूनच देखाव्याचा लाभ घेऊ शकतात. ज्या ऐतिहासिक मंदिराचा देखावा साकारायचा आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जावून मंडळाची टीम त्याचा अभ्यास करते. त्या मंदिराचे विविध अँगल्सने फोटो काढले जातात. त्याचं व्हिडीओ शुटींग करून त्यावर तज्ज्ञांची मतं घेतली जातात आणि नंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होते आणि गणेशोत्सवाच्या आधी हा देखावा पूर्ण होते. त्याच्या अचूक नियोजनाची आणि अंमलबजावणी जबाबदारी खास टीम वर दिली जाते. शास्त्रशुद्ध पूजा आणि संपन्न परंपरेचं भान श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत प्रत्येक गोष्टी ही शास्त्रशुद्ध आणि आपल्या संपन्न परंपरेचं भान राखूनच केली जाते. या दहा दिवसांच्या पूजेअर्चेचं खास नियोजन केलं जातं. पूजाविधीत पारंगत असणारे गुरूजी ही जबाबदारी सांभाळतात. बाप्पांच्या स्थापनेच्या वेळी पूजेचा मानही एखाद्या मान्यवरांना दिला जातो. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि विजय भटकरांनाही हा मान मिळाला आहे. दगडूशेठ गणपतीच्या स्थापनेची पूजा पाहण्यासाठीही अनेक भाविक मंडपात हजेरी लावतात.
Dagduseth Ganpati
महिलांच अथर्वशीर्ष ऋषीपंचमीला दगडूशेठ गणपती समोर होणारं महिलांचं सामुहिक अथर्वशीर्ष पठण हा या मंडळाचा आणखी एक लक्षवेधी उपक्रम आहे. गेल्या 40 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. मागील वर्षी यात 27 हजार महिलांनी सहभाग घेतला होता तर यावर्षी 35 ते 40 हजार महिला सहभागी होतील असा अंदाज ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी व्यक्त केला. पूजेत जे अधिकार पुरूषांना आहेत तेच अधिकार महिलांनाही आहेत याच भूमिकेतून मंडळानं महिलांकडून पूजा, अभिषेक, यज्ञ-यागही करून घेतले आहेत. समानता ही फक्त भाषणात नसावी तर ती प्रत्यक्ष कृतीत असावी हेच मंडळाने आपल्या कृतीतून दाखवून दिलंय. सामाजिक उपक्रम दगडूशेठ गणपती मंडळाचे सामाजिक क्षेत्रातलं काम आणि उपक्रमही थक्क करणारं आहे. गेली अनेक दशकं मंडळानं विविध उपक्रमांनी सेवेचं मोठं काम उभ केलं आहे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची मुलं, विटभट्टी कामगार अशा समजातल्या तळाशी असणाऱ्या वंचीत समाजातल्या लोकांसाठी मंडळ अनेक उपक्रम राबवतं. पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमध्ये राज्यातल्या कानाकोपऱ्यातून गरिब रूग्ण उपचारासाठी येत असतात. बाराशे खाटांच्या या हॉस्पिटलमधल्या रूग्णांना उत्तम आणि पौष्टिक जेवण मिळावं यासाठी दगडूशेठ गणपती मंडळाने हॉस्पिटलमधल्या स्वयंपाकघराचं दोन कोटी रूपयांची देणगी देवून आधुनिकीकरण केलं आहे. दररोज सकाळ संध्याकाळ बाराशे रूग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणं जेवण दिलं जाते. यासाठी वर्षाचा 16 कोटी रूपयांचा खर्च मंडळ करतं. मंडळाचा वर्षाचा ताळेबंद हा 68 कोटी रूपयांचा आहे. लोक गणपतीला भक्तिभावाने एक रूपयांपासून ते काही कोटींपर्यंत अर्पण करतात. देणगीतल्या प्रत्येक पैशाचा चांगला विनियोग व्हावा याकडे मंडळाचं कटाक्षाने लक्ष असतं. जलसंवर्धन, वृक्षारोपण, हरित वारी असे अनेक उपक्रम वर्षभरात राबवले जातात. मंडळाने केलेल्या वृक्षारोपणात झाडं जगण्याचं प्रमाण तब्बल 70 ट्क्के आहे. शाही मिरवणूक पुण्याची गणेशोत्सवाची मिरवणूक दीर्घ काळ चालते. सगळ्यांच्या आकर्षण असतं ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं. पहाटेच्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ गणपती बाहेर निघतात आणि लोकांमध्ये चैतन्य पसरते. आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट आणि पारंपरिक ढोल-ताशांचा गजर अशा शाही थाटात निघणारी श्रीमंत बाप्पांची मिरवणूक डोळ्यांचं पारणं फेडणारी असते. उत्सव साजरा करताना परंपरेचं भान, त्याचा आधुनिकतेची आणि प्रबोधनाची जोड, परंपरा आणि आधुनिकतेला मानवतेचा, सेवेचा स्पर्श दिल्यानं श्रीमंत दगडूशेठ गणपती सर्वाचं आराध्य दैवत ठरलंय.
First published:

पुढील बातम्या