'आई, माझी काळजी करू नकोस मी मजेत आहे', शहीद जवानाचे हे शब्द ठरले अखेरचे

'आई, माझी काळजी करू नकोस मी मजेत आहे', शहीद जवानाचे हे शब्द ठरले अखेरचे

'तु माझी काळजी करू नकोस. मी मजेत आहे. तु स्वत:च्या तब्येतीची काळजी घे' असा त्यांचा संवाद झाला आणि आजच तौफिक यांचा जीवनप्रवास थांबला.

  • Share this:

बीड, 01 मे : 'आई, तू माझी काळजी करू नको. मी मजेत आहे. तू स्वत:च्या तब्येतीची काळजी कर' हे शब्द शेवटचे ठरले. गडचिरोलीमधील भूसुरुंग दुर्घटनेमध्ये शहीद तौसिफ शेख यांचं त्यांच्या आईसोबत आज सकाळी 11.15 फोनवर बोलणं झालं होतं. आणि त्यांचं हे बोलणं अखेरचं ठरलं. गडचिरोलीमध्ये झालेल्या माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये तौसिक शेख हे शहीद झाले.

आज सकाळीच ते त्यांच्या आईशी फोनवर बोलले. 'तु माझी काळजी करू नकोस. मी मजेत आहे. तु स्वत:च्या तब्येतीची काळजी घे' असा त्यांचा संवाद झाला आणि आजच तौफिक यांचा जीवनप्रवास थांबला. तौफिक यांचा आईशी झालेला संवाद अखेरचा असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली. शहीद जवान तौफिक यांच्या जाण्यामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे.

या हल्यात शहीद झालेले पोलीस शिपाई तौसिफ आरिफ शेख हे पाटोदा शहरातील क्रांतीनगरमधील रहिवाशी आहेत. आरिफ शेख यांना 3 मुलं आहेत. यापैकी तौसिफ हे 2 नंबरचे होते. हॉटेलवर काम करून आरिफ यांनी मुलांना शिकवलं. आजही ते हॉटेलमध्ये काम करतात. मात्र, गरिब घरातील तौसिफ हे मोठ्या मेहनतीने 2009-10 च्या पोलीस भरतीमध्ये पोलीस दलात सहभागी झाले.

भरती झाल्यानंतर त्यांचा 2012 मध्ये विवाह झाला. त्यांना एक 5 वर्षाचा आणी दुसरा 3 वर्षांचा असे दोन मुलं आहेत. पत्नी आणि मुलांना घेऊन तौसिफ हे गडचिरोलीत राहत होते. तौफिक यांच्या अशा जाण्यावर त्यांचं संपूर्ण कुटुंब पोरकं झालं आहे.

गडचिरोलीच्या जंगलात माओवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक

गडचिरोलीमध्ये जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी माओवाद्यांच्या विरोधातली मोहीम तीव्र केली आहे. सुरक्षा पथकं आणि माओवाद्यांमध्ये जोरदार चकमकी सुरू आहेत. गडचिरोलीमधल्या जांभूरखेडा भागात माओवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून शीघ्र कृती दलाच्या जवानांवर भीषण हल्ला केला. या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले तर गाडीच्या चालकाचा मृत्यू ओढवला.

हेही वाचा: गडचिरोली माओवादी हल्ला: आई-वडील, 4 बहिणी, पत्नी आणि 2 मुलांचं सुखी कुटुंब झालं पोरकं

माओवादी जंगलात लपल्याचा संशय

माओवादी हल्ला घडवून आणण्यासाठी जंगलातच लपलेले आहेत, अशी खबर सुरक्षा यंत्रणांना होती. जांभूरखेडाच्या या जंगलात मोठ्या प्रमाणावर माओवादी लपून बसल्याची सूत्रांची माहिती होती. त्यामुळेच माओवादविरोधी पथकाने या जंगलात युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली आहे.

संयुक्त शोधमोहीम

गडचिरोली पोलिसांसह सी - 60 कमांडोंनी संयुक्तपणे इथे ही शोधमोहीम हाती घेतली आहे. याच सी - 60 कमांडोंना गस्तीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाला माओवाद्यांनी लक्ष्य केलं. माओवादी गडचिरोलीच्या जंगलात अशी पद्धतीने हल्ला करतील, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये असा प्रकारच्या हल्ल्याची शक्यता वर्तवली जात होती.

दंतेवाडा हल्ला

याआधी 10 एप्रिलला छत्तीसगडमधल्या दंतेवाडामध्ये माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजपचे आमदार भीमा मंडावी आणि 4 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू ओढवला होता. मागच्या वर्षी गडचिरोलीमध्येच माओवादविरोधी कारवाईमध्ये 16 माओवादी मारले गेले होते. 22 एप्रिल 2018 ला एटापल्लीमध्ये माओवादविरोधी पथकाने ही कारवाई तीव्र केली होती. बोरियाच्या जंगलात माओवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये झालेल्या चकमकीत हे माओवादी ठार झाले.

साईनाथ आणि सिनू ठार

या कारवाईत माओवाद्यांचा म्होरक्या साईनाथ आणि सिनू यांनाही मारण्यात आलं. माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं आणि स्फोटकंही जप्त करण्यात आली. महाराष्ट्रात गेल्या 40 वर्षांतली ही सगळ्यात मोठी कारवाई होती. माओवाद्यांनी या कारवाईचा बदला घेण्यासाठीच गडचिरोलीमध्ये हा हल्ला घडवला, याला गडचिरोलीचे विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार यांनीही पुष्टी दिली आहे.


VIDEO : गडचिरोलीत जिथे स्फोट घडला 'त्या' परिसरात पोहोचला न्यूज18 लोकमतचा प्रतिनिधी, संपूर्ण आढावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 09:07 PM IST

ताज्या बातम्या