सोलापूर, 24 जून : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवाद्यांशी सामना करत असताना सोलापूरचे CRPF जवान सुनिल काळे यांना वीरमरण आले. आज त्यांच्या मुळगावी शोकाकूल वातावरणात सुनिल काळे यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
23 जून रोजी पहाटे जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) पुलवामा (Pulwama) इथं दशहतवाद्यांविरोधात लढत असताना पानगांवचे CRPF जवान सुनिल काळे यांना वीरमरण प्राप्त झाले. या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. शहीद सुनिल काळे यांचे पार्थिव विशेष विमानाने सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पानगाव या त्यांच्या मुळगावी आणण्यात आले होते.
आज सकाळी शहीद काळे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या गावच्या या शूर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी गावाकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. 'अमर रहे रहे सुनिल काळे अमर रहे' च्या घोषणा देत सुनिल काळे यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.
सुनिल काळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई, दोन भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे. सुनिल काळे हे गावात सर्वांच्या मदतीला धावून येत होते. काही दिवसांपूर्वी ते सुट्टीवर आले असता त्यांनी पाणी फाउंडेशनसाठी काम देखील केले होते. सुनिल काळे गेल्या 17 वर्षांपासून सैन्यात कार्यरत होते. येत्या वर्षभरात ते सीआरपीएफमधून निवृत्त होणार होते. यासाठी त्यांनी गावात राहण्याचे नियोजन केले होते. सुनिल काळे यांच्या जाण्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.