मित्राच्या बर्थडेला गेले तलावावर, चारही शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

मित्राच्या बर्थडेला गेले तलावावर, चारही शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

बेळगाव शहरापासून 5 किमी अंतरावर असलेल्या सावगाव गावानजिकच्या धरणात चौघा शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

  • Share this:

बेळगाव, 21 नोव्हेंबर: चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण बेळगावात खळबळ उडाली आहे. बेळगाव शहरापासून 5 किमी अंतरावर असलेल्या सावगाव गावानजिकच्या धरणात चौघा शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.

ईद ए मिलादनिमित्त शाळेला सुट्टी असल्याने ही शाळकरी मुले जीए 06 एच 9100, आणि केए 22 इ पी 8061 क्रमांकाच्या दोन दुचाकीवरून सावगाव नजिकच्या धरणाजवळ मौजमजा करण्यासाठी गेली होती. यावेळी त्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही.

अंगावरील कपडे आणि बूट काढून धरणात उतरलेल्या त्या मुलांचा पाय घसरला आणि ती गटांगळ्या खात पाण्यात बुडाली. नजिकच्या शिवारात काम करणाऱ्या महिलांनी धरणाशेजारी ठेवण्यात आलेल्या दुचाकी आणि त्यावर ठेवलेले कपडे पाहिल्यानंतर त्यांना मुलं पाण्यात बुडल्याचा संशय आला. त्यांनी ही माहिती गावकऱ्यांना दिली.

पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांना ही माहिती मिळताच तेही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी पाणबुड्यांच्या मदतीने मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चौघांचे मृतदेह हाती लागले आहेत.

साहिल युवराज बेनके (वय 15)राहणार रामघाट रोड, बेनकनहळी, चैतन्य गजानन भांदुर्गे (वय 15 )राहणार भाग्यनगर, अनगोळ, अमनसिंह मुकेशसिंह राहणार गणेशपूर हिंडलगा आणि गौतम नितीन कलघटगी (वय 15 )राहणार कोरे गल्ली, शहापूर अशी बुडुन मरण पावलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत.

हे चौघेही दहावीचे विद्यार्थी होते. या चौघांपैकी एकाचा वाढदिवस असल्याने तो साजरा करण्यासाठी ही चौघे सावगावनजिकच्या धरणाकडे गेल्याचे सांगण्यात येते. मित्राच्या वाढदिवसाला या चौघांचा असा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या चौघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.


VIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2018 08:19 PM IST

ताज्या बातम्या