प्रणाली कापसे, प्रतिनिधी
मुंबई, 10 जुन: मुंबईसारख्या महानगरात माणसाचा जीव हा किड्या-मुंग्यासारखा झाला आहे. इथं लोक मेले तरी त्यांचं कुणाला सोयरं सुतक नसतं. त्यात सरकारी अधिकारी तर मेलेल्या टाळूचं लोणी खालया ही तयार असतात. असाच प्रकार घडलाय तो मुंबईतल्या विक्रोळीच्या परिसरात.
एका खड्ड्याने घेतला 4 जणांचा बळी
मृतक अश्विन हेबारे वय वर्ष 29
मृतक विशाल शेलार वय वर्ष 22
मृतक चंद्रशेखर मुसळे वय वर्ष 28
मृतक हमिद अब्दुल शेख वय वर्ष 32
या चार जणांचा 18 एप्रिल 2019ला एका विचित्र अपघातात मृत्यू झाला. 50 दिवसानंतर ही तीच बातमी पुन्हा सांगण्याचं कारण असं की, पालिकेच्या अधिकाऱ्यांना कदाचित हे मृत्यू किरकोळ वाटतात. काही जणांचा जीव गेल्याशिवाय त्यांना जाग येणार नाही.
स्थानिक नगरसेविकेच्या म्हणण्याकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिलं असतं तर आज 4 घरातल्या चुली विकल्या नसत्या असं मृतक चंद्रशेखर मुसळे यांच्या भावाचं म्हणणं आहे.
हेही वाचा : पाकिस्तानबद्दल भारतीय लष्करप्रमुख रावत यांनी केलं धक्कादायक वक्तव्य
इतकं सगळं झालं असताना पालिकेचे अधिकारी मात्र नगरसेविकेच्या तक्रारीला भिक ही घालत नाहीत. इतकचं काय तर नगरसेविकेची कामं करायची नाही अशी तंबीच वरिष्ठांकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेला नागरिकांची किती काळजी आहे हे यावरून स्पष्ट होतं.
या घटनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली आहे. पण सत्ताधाऱ्यांचा अंकुश नसलेले अधिकारी मात्र अजूनही आपल्याच गुर्मित आहेत. त्यांची गूर्मी उतरण्यासाठी कदाचित अजून काही जणांचे बळी जावे लागतील अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात आली आहे.
पावसाळा तोंडावर आला आहे. त्यात हा रस्ता पुन्हा खचण्याची दाट शक्यता आहे. किमान पाऊस सुरू होण्यापूर्वी तरी बीएमसी अधिकाऱ्यांनी बातमीची गंभीर दखल घेऊन इतरांचे जीव वाचवावे अशी साधी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
औरंगाबादेत बारचालकाची ग्राहकाला बेदम मारहाण, VIDEO व्हायरल