मोहन जाधव, प्रतिनिधी
रायगड, 06 फेब्रुवारी : काँग्रेसचे निष्ठावंत आणि दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले यांचे कट्टरसमर्थक म्हणून ओळखले जाणारे पेणचे माजी आमदार आणि राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री रवीशेठ पाटील यांनी मंगळवारी आपल्या हजारो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकुर, पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकुर, बाळासाहेब पाटील आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
रवीशेठ पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर रायगडच्या राजकारणात खळबळ उडाली होती. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधक एकत्र येत असल्याने रायगडातही या महाआघाडीच्या राजकारणाने जोर पकडला आहे. मात्र, प्रत्येक ठिकाणची राजकीय स्थिती वेगळी असल्याने शिवाय रायगडात काँग्रेस-शेकापचे विळ्याभोपळ्याचे नाते असल्याने येथे हे महाआघाडी कशी यशस्वी होणार हा प्रश्न आहे. या महाआघाडीच्या राजकारणातूनच रवीशेठ पाटील यांनी काँग्रेसला रामराम केल्याचे राजकीय तज्ज्ञांनी सांगितलं.
रवीशेठ पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये मोठा फटका बसणार आहे. पेण, रोहा तालुक्यातील काँग्रेस जवळपास संपुष्टात आली आहे. रवीशेठ पाटील हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचेही निकटर्वीय म्हणून ओळखले जातात. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी रवीशेठ पाटील यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली होती.
माजी खासदार रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर यांच्याशी रवीशेठ पाटील यांचे घनिष्ठ संबंध असल्याने भाजपची वाट रवीशेठ पाटील यांना सहज उपलब्ध झाली. रवीशेठ पाटील हे शिवसेनेमध्ये जाणार, असेही वृत्त होते. मात्र, ते निराधार ठरले आहे. रवीशेठ पाटील यांनी रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
Special Report : ऑनलाईन बँकिंग करताना सावधान! या एका गोष्टीमुळे होईल मोठं नुकसान