यवतमाळ, 18 एप्रिल : जिल्ह्यातल्या इंद्रठाणा शिवारातील एका विहिरीमध्ये रात्री तब्बल 15 नीलगाई पडल्याचा प्रकार घडला होता. वनविभागानं जवळपास 5 तास बचावकार्य करत नीलगाईंना जीवदान दिलं आहे. जेसीबीच्या मदतीनं हे बचावकार्य करत सर्वच नीलगाईंना वनविभागाच्या पथकानं सुखरूप बाहेर काढलं.
(वाचा - ज्येष्ठ नागरिकांना मिळेल खूशखबर! NPS बाबत सरकार घेऊ शकतं मोठा निर्णय)
नेर तालुक्यातील इंद्रठाणा शिवारात मोहन किसन राठोड यांच्या शेतात एका विहिरीचं काम सुरू आहे. विहिर जवळपास तीस फूट खोल खोदलेली होती. शनिवारी रात्री पाण्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या नीलगाईंचा एक कळप या विहिरीत पडला. 15 नीलगाई या कळपात होत्या. सकाळी शेतकरी शेतात आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली. त्यानंतर नेर वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे यांच्यासह एक पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी त्वरित नीलगाईंना बाहेर काढण्यासाठी बचावमोहीम सुरू केली.
(वाचा -'कापडी मास्क वापरणं टाळा', डॉक्टरांनी सांगितलं कोरोनापासून कसा करायचा बचाव)
विहिरीचे काम सुरू असल्याने तिला कठडे नव्हते. त्यामुळं या नीलगाईंना बाहेर काढण्यात अडचण येत होती. त्यामुळं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोरीपासून जाळी तयार केली आणि त्यात एकेका नीलगाईला अडकवून जेसीबीच्या सहाय्याने त्यांना सुखरुप बाहेर काढत जीवदान दिलं. जवळपास 5 तास ही बचाव मोहीम चालली.
वन विभागाकडून वन्य प्राण्यांच्या रक्षणासाठी दरवर्षी लाखोंचा खर्च केला जातो. प्राण्यांना जंगलातच पाणी मिळावं म्हणून पाणवठे तयार केले जातात. मात्र तरीही दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, प्राणी पाण्यासाठी वस्त्यांकडं धाव घेऊ लागतात. त्यामुळं जंगलातील प्राण्यासाठीच्या सुविधांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा शहर किंवा मानवी वस्तीकडं आल्यानंतर अनेक प्राणी त्यांच्या जीवालाही मुकत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Yavatmal, Yavatmal news