मराठवाड्यातले तलाव सुनेसुने, पाण्याअभावी विदेशी पाहुण्यांनी फिरवली पाठ

मराठवाड्यातले तलाव सुनेसुने, पाण्याअभावी विदेशी पाहुण्यांनी फिरवली पाठ

मराठवाड्यातले तलाव सुनेसुने, पाण्याअभावी विदेशी पाहुण्यांनी फिरवली पाठ

  • Share this:

लातूर, 07 फेब्रुवारी: दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाड्याचं पाणीबाणीनं प्रचंड नुकसान केलं. त्यातल्या त्यात मोठी बाजारपेठ असलेल्या लातुरात रेल्वेनं पाणी आणावं लागल्यानं नकारात्मक संदेश गेला. परिणामी अनेक उद्योजकांनी लातूरकडे पाठ फिरवली. हे कमी म्हणून की काय आता लातूरच्या पाणीबाणीची बातमी सातासमुद्रापार पोहचलीय. दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून लातूर जिल्ह्यात येणाऱ्या विदेशी पाहुण्यांनी लातूरकडे पाठ फिरवलीय. त्यामुळे ज्या तलावांच्या काठावर किलबिलाट असायचा ते तलाव आज सुनेसुने आहेत.

लातूर जिल्ह्यातील व्हटी, कव्हा, रामवाडी, भंडारवाडी हे मोठे तलाव आहेत. हिवाळ्यात या तलावांच्या काठावर विदेशी पाहुण्यांची गर्दी असायची. फ्लेमिंगो, राजहंस, ब्राम्हणी बदक अशा अनेक पाणपक्ष्यांचा किलबिलाट असायचा. पण गेल्या काही वर्षात सतत पडणाऱ्या दुष्काळानं पक्षी बेघर झाले. पाऊसकाळ कमी झाल्यानं तलाव लवकर कोरडे पडू लागले. ज्या बॅकवॉटरच्या जमिनीवर शेवाळ हे फ्लेमिंगोचं आवडतं अन्न उगवणं बंद झालं. त्यामुळे त्यांची उपासमार होवू लागल्यानं दरवर्षी तलावांचे सजणारे काठ यावर्षी सुनेसुने झालेत, असं निरिक्षण पक्षी अभ्यासक धनराज गुट्टे यांनी नोंदवलं.

कमी पाऊसमान या नैसर्गिक कारणाबरोबरच मानवी कारणानंही पक्ष्यांच्या अन्नावर बुलडोजर फिरला असल्याचं गुट्टे सांगतात. तलावातलं पाणी कमी झाल्यावर शेतकरी गाळ उपसा करतात. त्यामुळे पक्ष्यांना लागणारं अन्न तयार होत नाही. शिवाय काही शेतकरी अनेक शेतकरी गाळ असलेल्या भागात अतिक्रमण करून पेरा करतात. पिकांच्या संरक्षणासाठी म्हणून पक्ष्यांना हाकलून लावतात. त्यामुळेही वर्षानुवर्ष स्थलांतर करून येणाऱ्या पक्षांना त्यांचा ठिकाणा बदलावा लागतोय.

स्थलांतर करून येणारे सगळेच पक्षी पिकांना हानी पोहोचवत नाहीत. अनेक पक्षी हे पिकांवरील कीड, आळ्या, बुरशी, किडे खातात. हे शेतकऱ्यांना मदत करणारं असतं तर पक्षांना अन्न देणारं असतं. पण शेतकरी पिकांवर मोठ्या प्रमाणात फवारणी करत असल्यानं पक्षांना पुरेसं अन्न मिळत नाही. अन्न आणि पाण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या पाहुण्यांचं अन्न पाणीच बंद झाल्यानं परदेशी पाहुण्यांनी मराठवाड्याकडे पाठ फिरवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2020 06:43 PM IST

ताज्या बातम्या