News18 Lokmat

मयत प्रथमेशच्या 'जतन' शुक्राणूंपासून सरोगसीचा पहिलाच यशस्वी प्रयोग !

उच्च शिक्षणासाठी जर्मनीला गेलेल्या मुलाचा ब्रेन ट्युमरने मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जतन केलेल्या शुक्राणूंच्या मदतीने आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून जुळी मुलं मिळवण्याचा चमत्कार राजश्री पाटील या आईने केलाय. पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलच्या मदतीने अकाली गेलेल्या मुलाची पोकळी भरून काढण्यासाठी आयव्हीएफ या तंत्रज्ञानाचा वापर करून सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला गेलाय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Feb 14, 2018 08:19 PM IST

मयत प्रथमेशच्या 'जतन' शुक्राणूंपासून सरोगसीचा पहिलाच यशस्वी प्रयोग !

14 फेब्रुवारी, पुणे : उच्च शिक्षणासाठी जर्मनीला गेलेल्या मुलाचा ब्रेन ट्युमरने मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जतन केलेल्या शुक्राणूंच्या मदतीने आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून जुळी मुलं मिळवण्याचा चमत्कार राजश्री पाटील या आईने केलाय. पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलच्या मदतीने अकाली गेलेल्या मुलाची पोकळी भरून काढण्यासाठी आयव्हीएफ या तंत्रज्ञानाचा वापर करून सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला गेलाय. मृत माणसाच्या शुक्राणूंपासून अशा पद्धतीने सरोगसी मदरचा यशस्वी प्रयोग करून दाखवण्याची हा पहिलाच प्रयत्न असल्याचं सह्याद्री हॉस्पिटलकडून सांगण्यात आलंय.

याबाबतची सविस्तर हकीगत अशी की, पुण्यातील दामले प्रशालेच्या शिक्षिका राजश्री पाटील यांचा 25 वर्षीय मुलगा प्रथमेश शिक्षणसाठी जर्मनीला गेला होता. पण तिकडेच त्याला ब्रेन ट्युमर झाल्याचं निदान झालं आणि त्यातच तो कोमात गेला. तब्बल साडेतीन वर्षे त्याने मृत्यूशी झुंज दिली पण अखेर त्याचा मृत्यू झाला. पण याच काळात जर्मनीतल्या प्रयोग शाळेत टेस्टिंगसाठी प्रथमेशचे शुक्राणू जतन करून ठेवण्यात आले होते. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच प्रथमेशची कायमची आठवण राहावी म्हणून याच जतन केलेल्या शुक्राणूंच्या साहाय्याने सरोगसी मदरचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मग नातेवाईकांमधलीच एक महिला सरोगसीसाठी पुढे आली. राजश्री पाटील यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाला तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सह्याद्री हॉस्पिटलची मोलाची मदत झाली.

आयव्हीएफ इन्स्टिट्यूट आणि डॉ सुप्रिया पुराणिक यांनी सरोगसीचं तंत्रज्ञान वापरून मयत प्रथमेशचे शुक्राणू आणि अनामिक दात्याकडून स्त्रीबीज घेऊन त्यापासून भ्रूण तयार केले आणि ते राजश्री पाटील यांच्याच नात्यातील महिलेच्या गर्भाशयात वाढवले... या सगळ्या प्रयत्नांना यश येत अखेर यश आलं. आणि या सरोगसी मदरने १२ फेब्रुवारी रोजी दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला. प्रथमेशच्या शुक्राणू पासून जन्माला आलेल्या या मुलांना राजश्री पाटील या जन्मदात्या आणि पालक म्हणून स्वतःच नाव देणार आहेत. या जुळ्या मुलांची नावं प्रथमेश आणि प्रिशा ठेवणार असल्याचं ही राजश्री पाटील यांनी सांगितलं. नियतीने जरी एक मुलगा त्यांच्यापासून हिरावून घेतला असला तरी मातृत्वाच्या ओढीने आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने राजश्री पाटील या आता दोन तान्ह्या मुलांच्या पुन्हा आई झाल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2018 08:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...