मुंबई, 28 ऑक्टोबर : मुंबईत फेरीवाल्यांनी मनसेचा मालाडचा विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे याला जबर मारहाण केलीय. या मारहाणीत सुशांत माळोदे यांचा हात फ्रक्चर झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर जखम झालीय. मालाड स्टेशन परिसरात आज सुशांत माळवदे यांनी फेरीवाल्यांना हटव्याचा प्रयत्न केला असता सर्व फेरीवाल्यांनी एकत्र येत त्यांना जबर मारहाण केलीय. माळवदे यांच्यावर मालाड परिसरातल्या जान्हवी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मनसेनं मुंबईत रेल्वेस्टेशन बाहेर फेरीवाले हटाव मोहीम हाती घेतल्यानंतर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांची बाजू घेत मनसेला प्रतिआव्हान दिलं होतं. मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना हटवण्याचा प्रयत्न केला तर फेरीवालेही जशासतशे प्रत्युत्तर देतील, त्यानंतर आज लगेचच मालाडमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटल्याचे बघायला मिळालेत. फेरीवाल्यांच्या या हिंसक हल्ल्यानंतर मनसेकडूनही कदाचित फेरीवाल्यांवर पुन्हा हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या फेरीवाले विरूद्ध मनसे वादात वेळीच हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, मारहाण झालेल्या मनसे कार्यकर्ते सुशांत माळवदे यांना भेटण्यासाठी मालाडला निघालेले राज ठाकरे वाहतूक कोंडीमुळे माघारी फिरलेत. ते आता उद्या मालाडला जाणार आहेत.