सांगली, 27 जानेवारी : राज्यासह देशभरात सर्वत्र काल 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. मात्र, याच दिवशी सांगली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. मुख्याध्यापकाचा पदभार का देत नाही म्हणून जत तालुक्यातील खोजानवाडी येथे एका महिला शिक्षिकेचा शाळेतील दोन शिक्षकांनी विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दोन्ही शिक्षकांवर जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
या महिला शिक्षिका जिल्हा परिषदेत मागील 25 वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत आहे. गेल्या तीन वर्षापासून त्यांच्याकडे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, खोजनवाडी येथे प्रभारी मुख्याध्यापकचा कार्यभार आहे. तर याठिकाणी बाळू तुकाराम साळुंखे, अर्जुन महादेव माळी, उमेश कोळी, दिनेश चव्हाण असे शिक्षक काम पाहत आहेत.
दरम्यान, काल 26 जानेवारीला शाळेतील झेंडा वंदनाचा कार्यक्रम संपवून संबंधित महिला शिक्षिका कार्यालयात एकट्या बसल्या होत्या. याचवेळी शिक्षक बाळू सांळुखे व अर्जुन माळी त्यांच्या कार्यालयात गेले. तसेच दरम्यान, बाळु सांळुखे यांनी मला तुम्ही मुख्याध्यापकाचा चार्ज का देत नाही, मला मुख्याध्यापकाचा चार्ज देणेबाबत गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती जत यांचेकडून पत्र दिले आहे, तरी सुध्दा तुम्ही मला शाळेच्या मुख्याध्यापकाचा चार्ज देत नाही, असे म्हणत त्यांनी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत या शिक्षिकेचा विनयभंग केला.
हेही वाचा - अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, पुण्यात मित्राच्या पत्नीवर बलात्कार
तसेच अर्जुन माळी यांनी ही बाई कसा चार्ज देत नाही ते आपण बघून घेवू, असे म्हणून शिवीगाळी आणि दमदाटी केल्याचे संबंधित महिला शिक्षिकेने फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात बाळू साळुंखे आणि अर्जुन माळी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लवटे करीत आहेत. याप्रकरणी सांगलीतील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Sangli