EXPLAINER : WTC Final मध्ये वापरला जाणारा ड्युक बॉल का आहे वेगळा? विराटसाठीही आहे कोडं

EXPLAINER : WTC Final मध्ये वापरला जाणारा ड्युक बॉल का आहे वेगळा? विराटसाठीही आहे कोडं

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) 18 जूनपासून साऊथम्पटनमध्ये खेळवली जाणार आहे. या मुकाबल्यासाठी आयसीसीने (ICC) काही नियमांची शुक्रवारी घोषणा केली. हा सामना ड्युक बॉलने (Duke Ball) होणार असल्याचं आयसीसीने सांगितलं.

  • Share this:

मुंबई, 29 मे : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) 18 जूनपासून साऊथम्पटनमध्ये खेळवली जाणार आहे. या मुकाबल्यासाठी आयसीसीने (ICC) काही नियमांची शुक्रवारी घोषणा केली. हा सामना ड्युक बॉलने (Duke Ball) होणार असल्याचं आयसीसीने सांगितलं. इंग्लंडमधल्या सगळ्या टेस्ट मॅचमध्ये ड्युक बॉल वापरला जातो, पण न्यूझीलंड किंवा भारत त्यांच्या घरच्या मैदानात या बॉलचा वापर करत नाहीत. न्यूझीलंडमध्ये कूकाबूरा बॉलचा (Kookaburra Ball) तर भारतात एसजी बॉलचा (SG Ball) वापर होतो, त्यामुळे दोन्ही टीमसाठी ड्युक बॉल वापरणं वेगळंच आव्हान असेल.

ड्युक बॉल आणि इतर बॉलमध्ये काय फरक?

ड्युक बॉलच्या सीमवर जास्त दोरे असतात आणि सीम वरच्या बाजूला असते. कूकाबूरा आणि एसजी बॉलची सीम लवकर फाटते, पण ड्युक बॉलसोबत असं होत नाही. ड्युक बॉलचा आकार कूकाबूरा आणि एसजी पेक्षा छोटा असतो, त्यामुळे हा बॉल हातात योग्य पद्धतीने बसतो. ड्युक बॉलचं वजनही इतर बॉलच्या तुलनेत कमी असतं, त्यामुळे हा बॉल हवेच्या दिशेने जास्त स्विंग होतो, त्यामुळे बॉलर फक्त खेळपट्टीच नाही, तर हवेच्या हिशोबानेही ड्युक बॉलचा वापर करतात.

ड्युक बॉलची सीम हाताने शिवली जाते, त्यामुळे हा बॉल जास्त स्विंग होतो. 80 ओव्हरनंतरही या बॉलचा आकार बदलत नाही. दुसरीकडे एसजी आणि कूकाबूरा बॉलची शिलाई मशीनने केलेली असते. ड्युकचा बॉल जास्त काळ टणक राहतो, तर भारतात वापरला जाणारा एसजी बॉल 12 ते 15 ओव्हरमध्येच नरम पडायला लागतो, त्यामुळे फास्ट बॉलरना ड्युकने बॉलिंग करायला आवडतं.

ड्युक बॉलची भारताला अडचण

भारतीय बॅट्समन स्विंग बॉलिंगसमोर संघर्ष करत असल्यामुळे त्यांना ड्युक बॉलसमोर बॅटिंग करणं आणखी कठीण होतं. 2014 साली विराट कोहली (Virat Kohli) जेव्हा इंग्लंड दौऱ्यावर गेला होता, तेव्हा त्याला एकही अर्धशतक करता आलं नव्हतं. 5 टेस्ट मॅचमध्ये त्याने फक्त 13.50 च्या सरासरीने 134 रन केले होते. जेम्स अंडरसनच्या (James Anderson) आऊट स्विंगने विराटला खूप त्रास दिला होता.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या तयारीसाठी विराट कोहली आणि टीम इंडियाच्या इतर खेळाडूंनी आयपीएल दरम्यान ड्युक बॉलने सराव केला होता, पण हा बॉल खेळपट्टी आणि हवामानाच्या हिशोबाने त्याचे रंग दाखवतो, त्यामुळे इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतही टीम इंडियाला या बॉलने कठोर सराव करावा लागणार आहे.

Published by: Shreyas
First published: May 29, 2021, 6:53 PM IST

ताज्या बातम्या