मुंबई, 19 मे : लोकसभा निवडणुकीसाठी सातही टप्प्यातील मतदान अखेर संपले आहे. अनेक वृत्तवाहिन्या आणि संस्थांना आपला अंदाज अर्थात एक्झिट पोल वर्तवला आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असा अंदाज वर्तवला आहे. राज्यातही शिवसेना भाजपला जास्त मिळताना दिसत आहे. त्यामुळे 'मनसे फॅक्टर' सपशेल फ्लॉप ठरले अशी चिन्ह दिसत आहे.
'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत राज ठाकरे यांनी भाजप, विशेष करून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात जाहीर सभा घेतल्या होत्या. त्यांच्या सभांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा होईल अशी दाट शक्यता निर्माण झाली होती. परंतु, आज आलेल्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. न्यूज18 नेटवर्कच्या सर्व्हेत भाजप सेना युतीला 42 ते 45 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. तर दुसरीकडे इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडिया यांनीही 38-42 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. विशेष,म्हणजे, एक्झिट पोलमध्ये विश्वासाचा समजला जाणाऱ्या चाणक्यनेही भाजप युतीला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. युतीला 38 पेक्षा जास्त जागा मिळतील, असं अंदाज वर्तवला आहे.
महाराष्ट्रात कुणाला किती जागा?
भाजप - 21 ते 23
शिवसेना - 20 ते 22
काँग्रेस - 0 ते 1
राष्ट्रवादी - 3 ते 5
एकूण : महायुती - 42 ते 45
महाआघाडी - 4 ते 6
- टुडे चाणक्य
युती 38 ± 5
आघाडी 10 ± 5
इतर - 0
- इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोल (महाराष्ट्र)
युती - 38-42
आघाडी - 6-10
इतर - 0
- सीव्होटर एक्झिट पोल (महाराष्ट्र)
युती- 34
आघाडी - 14
इतर - 0
- एबीपी नेल्सन एक्झिट पोल (महाराष्ट्र)
युती - 34
आघाडी - 14
इतर - 0
यंदाची लोकसभा निवडणूक कोणत्या मुद्द्यांनी गाजली?
पश्चिम महाराष्ट्र
यावेळीची लोकसभा निवडणूक रंगली ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय जुगलबंदीने. पश्चिम महाराष्ट्र या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचा मनसुबा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आखण्यात आला होता. माढा, सातारा आणि बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 10 जागा आम्ही जिंकणार, असा दावा भाजपकडून करण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या माढा, बारामती, सातारा, कोल्हापूर यासह भाजप-शिवसेना युतीने जिंकलेल्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, शिरूर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. 2014 च्या निवडणुकीत युतीने मुसंडी मारत या भागात काँग्रेस-राष्ट्रवादीला पहिला हादरा दिला. यावेळी तर हे 10 मतदारसंघ जिंकण्याच्या इराद्याने मुख्यमंत्री फडणवीस मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या 8 जागा असून त्यामध्ये नगर दक्षिण, शिर्डी, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, दिंडोरी आणि रावेर या मतदारसंघांचा समावेश आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत युतीनं उत्तर महाराष्ट्रात एकहाती विजय मिळवत उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी सगळ्या जागा कायम राखणं भाजपसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. कारण यंदा प्रत्येक मतदारसंघात तुल्यबळ लढत होत आहे.
कोकण
महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्ती सतत चर्चेत असतात. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे हे त्यातलंच एक नाव. पण सध्या नारायण राणेंची राजकीय अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक राणेंसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला. तसंच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचेच वैभव नाईक हे जाएंट किलर ठरले होते. त्यांनी थेट नारायण राणेंना पराभवाची चव चाखायला लावली होती. त्यामुळे राणेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे, असं बोललं जाऊ लागलं.
कोकण आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत मुलगा निलेश राणे यांच्याकडे विजय खेचून आणणं राणेंसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. कारण काही महिन्यांतच राज्यात विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. अशावेळी राज्यातील सत्तेत काही वाटा मिळवायचा असल्याचं स्वबळावर काही आमदार निवडून आणणं राणेंसाठी क्रमप्राप्त ठरणार आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत नेमकं काय झालं?
मागील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची मोठी लाट निर्माण झाली होती. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना मानहाणीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपला देशभरात ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातही याचं प्रतिबिंब पाहायला मिळालं होतं. भाजप-शिवसेनेनं मोठी झेप घेतली होती. दुसरीकडे, तेव्हा सत्तेत असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दोन अंकीही जागा मिळवता आल्या नव्हत्या.
कुणाला किती जागा मिळाल्या?
भाजप - 23
शिवसेना - 18
राष्ट्रवादी - 4
काँग्रेस - 2
स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1
=========================================