मुंबई, 22 ऑगस्ट : कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी त्याचे पीएफ अकाउंट (PF Account) हे अत्यंत महत्वाचे असते. कारण या अकाउंटमधील पुंजी ही त्याच्या निवृत्तीनंतरच्या कालावधीचा तसेच आपत्कालीन स्थितीसाठीचा आधार असते. सरकारने पीएफ अकाउंटच्या अनुषंगाने अनेक महत्वपूर्ण आणि सकारात्मक बदल केले आहेत. पीएफबाबतची सर्व माहिती ऑनलाइन (Online) उपलब्ध झाली आहे. ही बाब कर्मचारी वर्गासाठी फायदेशीर ठरत आहे. परंतु, सध्या पीएफ खात्यातील बॅलन्स पाहण्यासाठी, केवायसी अपडेट करण्यासाठी किंवा प्रसंगी क्लेम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना वारंवार ईपीएफओच्या (EPFO) वेबसाइटवर जात लॉगिन करुन अकाउंटवर जावे लागते. यासाठी पासवर्ड, कॅप्चा कोड भरावा लागतो. त्यानंतरच कर्मचाऱ्यांना पीएफ संबंधी कामे करता येतात. या सर्व प्रक्रियेत वेळ जातो. परंतु, सरकारने असे एक अॅप (App) लॉन्च केले आहे की ज्या माध्यमातून पीएफ अकाउंटशी संबंधित कामांसोबतच, शासकीय योजना, स्कॉलरशीप, लसीकरण तसेच अन्य शासकीय कामेही करता येतात.
पीएफ अकाउंटवरील बॅलन्स तपासण्यासारखी छोटी कामे करण्यासाठी वारंवार ईपीएफओ वेबसाइटवर लॉगिन करुन वैतागला असाल तर, आता तुमचा हा त्रास कमी होणार आहे. कारण सरकारने एक अॅप लॉन्च केले असून, त्या माध्यमातून तुम्ही पीएफ अकाउंटसह अन्य शासकीय कामे सहज करु शकणार आहात.
उमंग (Umang -Unified Mobile Application For New – age Governance) असे या नव्या अॅपचे नाव असून, या अॅपची निर्मिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केली आहे. या माध्यमातून केंद्र सरकार, स्थानिक शासकीय कार्यालये, राज्य सरकारच्या सर्व सेवांचा लाभ मोबाईलच्या माध्यमातून घेता येऊ शकतो. या अॅपमध्ये विविध प्रकारच्या कॅटेगरीज आहेत. यात शेतकरी, सामाजिक सुरक्षा, विद्यार्थी, महिला आणि बालके, युवक, प्रमाणपत्रे, शिक्षण, अर्थिक, आरोग्य, पोलिस, पब्लिक, रेशन कार्ड, सामाजिक न्याय, पर्यटन, दळणवळण, युटिलिटी आदींचा समावेश आहे.
या उमंग अॅपच्या (Umang App) माध्यमातून पीएफसंबंधी सर्व कामे करता येऊ शकतात. विशेष म्हणजे या अॅपमध्ये कामासाठी प्रत्येकवेळी लॉगिन (Log In) करण्याची गरज नाही. एका ओटीपीच्या माध्यमातून तुम्ही काही क्षणात यात लॉगिन करु शकता. तसेच हे अॅप सुरु करण्यासाठी देखील वारंवार लॉगिन करण्याची गरज नाही. या अॅपवरुन अॅडव्हान्स क्लेम करणे तसेच 10-C फॉर्म, पासबुक, क्लेम रेंज, ट्रॅक क्लेम, युएएन अॅक्टिव्हेशन, युएएन अलॉटमेंट, केवायसी, आधार सीडिंग, ईपीएफओ कार्यालयाविषयी माहिती, जनरल सेवा, तक्रार दाखल करणे, तक्रारीच्या कार्यवाहीबाबतची स्थिती तुम्ही पाहू शकता.
उमंग अॅपवर लॉगिन करणं अत्यंत सोपं आहे. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. या अॅपवर तुम्हाला सर्वप्रथम युएएन (UAN) क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला ओटीपी (OTP) येईल. हा ओटीपी एंटर केल्यावर तुमचे लॉगिन होईल. विशेष म्हणजे तुम्ही अॅपमधून बाहेर पडलात तर लॉगआऊट होणार नाहीत. काही वेळेनंतर ऑटोमॅटिक लॉगइन होता येतं. यामुळे तुमचे काम अर्धवट न राहता, वेळेनुसार पूर्ण करता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Epfo news