16 नोव्हेंबर, बंगळुरू : ईपीएफ खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरावरील टॅक्सबाबत राष्ट्रीय प्राप्तिकर लवादाने अर्थात 'आयटीएटी'ने एक महत्वपूर्ण निकाल दिलाय. जर तुम्ही नोकरी सोडली असेल किंवा तुम्ही निवृत्त झाला असाल आणि तरीही तुमचं पीएफ खातं 'अॅक्टिव्ह' असेल तर यापुढे या पीएफ खात्यावर मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला आयकर भरावा लागणार आहे.
बंगळुरूमधील एका आयटी कर्मचाऱ्याच्या पीएफसंबंधीच्या खटल्यासंबंधी हा निकाल दिलाय. आयकर विभागासाठी हा अतिशय महत्वपूर्ण निकाल मानला जातोय. सर्वसाधारणपणे निवृत्तीनंतर फक्त पुढची 3 वर्षेच तुमच्या पीएफ रकमेवर व्याज दिलं जातं. पण काहीजण निर्धारित निवृत्ती कालमर्यादा पूर्ण होण्याआधीच नोकरी सोडतात पण आपलं पीएफ खातं तसंच पुढे चालूच ठेवतात आणि व्याज कमावतात. अशा प्रकरणांमध्येच पीएफवरील व्याजाच्या रकमेवरील टॅक्सवसूलीचा मुद्दा उपस्थित होतो.
नेमका काय होता 'तो' पीएफ खटला ?
बंगळुरूमध्ये एक मोठ्या हुद्द्यावरचे अधिकारी 26 वर्षांच्या नोकरीनंतर संबंधीत स्वॉफ्टवेअर कंपनीतून 1 एप्रिल 2002रोजी निवृत्त झाले. ते मोठ्या हुद्यावर असल्याने त्यांचा पगार जास्त होता, त्यामुळे साहजिकच त्यांची पीएफची रक्कमही जास्तच होती. निवृत्तीवेळी त्यांच्या पीएफ खात्यावर 37.39 लाख रुपये जमा होते. अर्थात त्यात व्याजाचीही रक्कम सामील होती. पण 9 वर्षांनंतर म्हणजेच 11 एप्रिल 2011रोजी त्यांच्या पीएफ खात्यावरची रक्कम वाढून 82 लाखांवर पोहोचली त्यातली तब्बल 44. 07 लाख एवढी रक्कम ही फक्त व्याजापोटी मिळालेली होती. ती ही निवृत्तीनंतर म्हणूनच प्राप्तिकर विभागाने त्याच्यावर आयकर लावला होता.
पण त्याविरोधात संबंधीत कर्मचारी अपिलात गेल्याने हा पीएफच्या व्याजावरील आयकर वसुलीचा मुद्दा उपस्थित झाला. आयकर अधिनियम 10(12) नुसार पीएफची रक्कम ही आयकर मुक्त असल्याचा संबंधीत कर्मचाऱ्याचा दावा होता. पण सुनावणीदरम्यान राष्ट्रीय प्राप्तिकर लवादाने त्यांचा दावा फेटाळून लावत निवृत्तीनंतरच्या व्याजाच्या रकमेवर टॅक्स लावण्याचे निर्देश दिलेत. या निर्णयामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या पीएफ खात्यावरील व्याजावरचा आयकर चुकवावा लागणार आहे.
दरम्यान, यावर्षी अजूनही केंद्र सरकारने पीएफ खात्यावरील व्याजाचा दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षानुसारच कर्मचाऱ्यांना त्याच्या पीएफवर 8.65 इतका व्याजदर मिळतोय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा