वीज बिलाच्या प्रश्नावरून अडचणीत आलेल्या उर्जामंत्र्यांनी भाजपवरच केला गंभीर आरोप

वीज बिलाच्या प्रश्नावरून अडचणीत आलेल्या उर्जामंत्र्यांनी भाजपवरच केला गंभीर आरोप

राज्य सरकारवर टीका केली जात असतानाच उर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपवरच गंभीर आरोप केला आहे.

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर : लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिलांमध्ये कुठलीही सवलत मिळणार नसल्याचे उर्जामंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना काळात अवास्तव बिले आकारण्यात आल्याचा आरोप अनेक ग्राहकांना केला आहे. यावरून राज्य सरकारवर टीका केली जात असतानाच उर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपवरच गंभीर आरोप केला आहे.

'कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. मात्र महावितरणला सर्वात मोठा फटका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजप सरकारने 'सरासरी' कार्यक्षमता न दाखविल्याने व वीज बिलांची वसुली न केल्याने बसला आहे. भाजप सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी 50 हजार कोटींच्या जवळपास पोहोचली,' असा आरोप नितीन राऊत यांनी केला आहे.

'कोरोना काळात वीज बिले भरले न गेल्याने महावितरणची थकबाकी 9 हजार कोटींनी वाढून ऑक्टोबरमध्ये 59,102 कोटींवर पोहोचली. मार्च 20 ला घरगुती ग्राहकांकडे असलेली 1374 कोटींची थकबाकी ही 4824 कोटींवर पोहोचली आहे. वाणिज्य ग्राहकांची 879 वरून 1241 कोटींवर तर औद्योगिकची 472 वरून 982 कोटींपर्यंत गेली आहे,' असं राऊत यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, वाढीव वीज बिलाच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या ग्राहकांना महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून तक्रारी तपासून वीज बिल दुरुस्त करून देण्यात येतील असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात बिल भरणा केंद्रावर किंवा वीज उपकेंद्रावर गेलेल्या ग्राहकांची 'महावितरण'च्या अधिकाऱ्यांनी आधी बिल भरायला लावून नंतर तपासणी करणार असल्याचे सांगून बोळवण केली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: November 18, 2020, 5:35 PM IST

ताज्या बातम्या