जळगावकरांनी देवाची नव्हे, 2 वर्षांपासून बंद असलेल्या 'डीपी'ची केली महाआरती!

महाआरती हा शब्द उच्चारला तर आपसूकच आपल्या डोळ्यासमोर एखाद्या देवाची प्रतिमा उभी राहते. मात्र, जळगावातील वाल्मीकनगर, कांचननगर परिसरातील नागरिकांनी देवाची नव्हे तर महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी चक्क दोन वर्षांपासून बंद असलेल्या 'डीपी'ची महाआरती केली.

News18 Lokmat | Updated On: Sep 5, 2019 06:58 PM IST

जळगावकरांनी देवाची नव्हे, 2 वर्षांपासून बंद असलेल्या 'डीपी'ची केली महाआरती!

राजेश भागवत, (प्रतिनिधी)

जळगाव, 5 सप्टेंबर: महाआरती हा शब्द उच्चारला तर आपसूकच आपल्या डोळ्यासमोर एखाद्या देवाची प्रतिमा उभी राहते. मात्र, जळगावातील वाल्मीकनगर, कांचननगर परिसरातील नागरिकांनी देवाची नव्हे तर महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी चक्क दोन वर्षांपासून बंद असलेल्या 'डीपी'ची महाआरती केली. नुसती महाआरती करून ते थांबले नाहीत तर शेंगदाणे आणि साखरेचा प्रसाद वाटून गांधीगिरी केली.

जळगाव शहरातील वाल्मीकनगर, कांचननगर परिसरात राहणाऱ्या अनेक नागरिकांचे विजेचे कनेक्शन महावितरण कंपनीने कापले आहे. वर्षानुवर्षे थकबाकी भरत नसल्याने ही कारवाई केल्याचे महावितरणकडून सांगितले जात आहे. विजेचे कनेक्शन कापल्याने येथील अनेक नागरिकांनी तारांवर आकडे टाकून वीज चोरताना दिसत आहेत. मात्र, त्यावर उपाय म्हणून महावितरण कंपनीने परिसरातील डीपीच बंद केली आहे. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून हा प्रश्न निकाली निघालेला नाही. नागरिकांनी थकीत वीज बिले भरावीत, या भूमिकेवर महावितरण कंपनी ठाम आहे. मात्र, दुसरीकडे नागरिक थकबाकी भरायला तयार नाहीत. आम्हाला देण्यात आलेली वीज बिले अवाजवी असून ती रद्द करून नव्याने डिमांड नोट भरून विजेचे नवे कनेक्शन द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. याप्रश्नी काही लोकप्रतिनिधींनी देखील मध्यस्थी केली होती. तरीही हा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे गुरुवारी दुपारी संतप्त नागरिकांनी लक्षवेधी आंदोलन करत महावितरण कंपनीचा निषेध नोंदवला.

गेल्या काही वर्षांपूर्वी जळगाव शहरातील वीज पुरवठा करण्याची जबाबदारी महावितरणने क्रॉम्प्टन कंपनीला दिली होती. क्रॉम्प्टनच्या काळात वाल्मीकनगर, कांचननगर परिसरातील नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले आली होती. या परिसरातील नागरिक हे कष्टकरी, मजूर असल्याने ते ही वीज बिले भरू शकत नव्हते. तेव्हापासून हा प्रश्न कायम आहे. क्रॉम्प्टननंतर पुन्हा महावितरणकडे कारभार आला. आता महावितरण थकीत बिलांचा मुद्दा उपस्थित करून या परिसरात नव्याने कनेक्शन द्यायला तयार नाही. आता तर 5 ते 6 महिन्यांपूर्वी येथील डीपी पण बंद करण्यात आली. त्यामुळे हजारो कुटुंबे अंधारात आहेत. |

मागील महिन्यात येथील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. परंतु, तरीही हा प्रश्न सुटला नाही. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. सणाच्या काळात अंधारात रहावे लागत असल्याने नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. मात्र, महावितरण कंपनीचा त्यांनी लक्षवेधी आंदोलन करत निषेध नोंदवला. दरम्यान, येत्या 8 दिवसात हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही महावितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल करू, असा इशारा यावेळी संतप्त नागरिकांनी दिला. या आंदोलनात शेकडो महिला, पुरुषांनी सहभाग नोंदवला.

Loading...

VIDEO : घराजवळच साचले पाणी, आदित्य ठाकरे पायी चालत पोहोचले 'मातोश्री'वर!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2019 06:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...