Home /News /news /

गिरीश महाजनांसोबत एकत्र बैठकीवर एकनाथ खडसेंचं सूचक विधान, म्हणाले...

गिरीश महाजनांसोबत एकत्र बैठकीवर एकनाथ खडसेंचं सूचक विधान, म्हणाले...

विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारणे आणि मुलीच्या पराभवामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे कमालीचे नाराज होते.

    जळगाव, 02 जानेवारी : विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारणे आणि मुलीच्या पराभवामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे कमालीचे नाराज होते. एवढंच नाहीतर त्यांनी यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन जबाबदार असल्याचा आरोपही केला होता. परंतु, आज जळगावच्या राजकारणाला वेगळं वळण मिळालं. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे एकत्र आले. या भेटीमुळे खडसेंचं बंड थंड झाल्याची चर्चा रंगली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन आज एकाच मंचावर एकत्र आले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला दोन्ही नेते एकत्र हजर होते. या बैठकीनंतर खडसे आणि  महाजन यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी बऱ्याच दिवसांनी दोघांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली? असा सवाल केला असता खडसे म्हणाले की, ' लोकसभा निवडणुकीला आम्ही सोबत होतो. त्यानंतर विधानसभेलाही एकत्र होतो. मधल्या काळात निवडणुका नव्हत्या. त्यामुळे एकत्र आलो नाही. त्यामुळे कधी एकत्र येण्याचा प्रश्नच आला नाही. आता तुमच्या मनात काही शंका असेल पण चिंता करू नका' असं उत्तर दिलं. तसंच, आजच्या बैठकीमध्ये  20 मंडळापैकी 16 मंडळावरील सदस्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. उरलेल्या 4 सदस्यांचा निर्णय हा नंतर होईल. महानगरची निवडणूक उद्या होणार आहे. जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्षांची निवडणूक ही 10 तारीख किंवा 11 तारखेला होईल. यासाठी भाजपकडे नावं आली आहे. त्याबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल. ही यादी गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील योग्य तो निर्णय घेईल, अशी अपेक्षा एकनाथ खडसेंनी बोलून दाखवली. या बैठकीला एकनाथ खडसे, गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, संघटनमंत्री किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, सुरेश भोळे आदी उपस्थित होते. एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट दरम्यान,  मुलीच्या पराभवास आणि आपले तिकीट कापण्यात पक्षातील काही लोकांचा हात असल्याचा आरोप करणारे एकनाथ खडसे यांनी आता थेट संबंधित नेत्यांची नावंच जाहीर केली आहे. 'मला तिकीट मिळू नये म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी कोअर कमिटीच्या बैठकीत नकारात्मक अहवाल दिला होता. या कमिटीतील माझ्या जवळच्या मित्रांनीच मला ही माहिती दिली,' असा खळबळजनक गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे. 'जे. पी. नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मी त्यांना ही सर्व माहिती दिली आहे. त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले तरी माझे समाधान झालेले नाही. मात्र मी भाजप सोडणार नाही, असेही खडसे यांनी स्पष्ट केले आहे. नाथाभाऊ शिवसेनेच्या संपर्कात जळगाव जिल्हा परिषदेवर एकनाथ खडसे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे ही जिल्हा परिषद भाजपच्या हातातून हिसकावून घेण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. भाजपमध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसेंची शिवसेनेला साथ मिळण्याची शक्यता असून शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी तसे संकेत दिले आहेत. एवढंच नाही तर त्यांनी एक मोठा गौप्यस्फोटही केला. नाथाभाऊ हे आपल्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुढच्या काही काळात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, जिल्हा परिषद ही शिवसेनेच्या ताब्यात येणार आहे. अनेक लोक आमच्या संपर्कात असून त्याबाबात जास्त काही आताच सांगणार नाही. आतापर्यंत खडसे हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे बोलले जात होत. खडसे यांनी याआधी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चाही केली होती. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एकनाथ खडसे यांनी पक्षातील आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, Chandrakant patil, Devendra Fadanvis, Eknath khadse, Girish mhajan, Jalgaon

    पुढील बातम्या