#Durgotsav2018 : बिबट्याचा हल्ला परतवून त्याला जीवदान देणाऱ्या धाडसी डॉक्टरची थरारक कहाणी!

#Durgotsav2018 :  बिबट्याचा हल्ला परतवून त्याला जीवदान देणाऱ्या धाडसी डॉक्टरची थरारक कहाणी!

'त्यांनी कधी गावात, कधी मशिदीत, कधी घरात, शाळेत शिरलेल्या बिबट्या, हरणांना सहीसलामत बाहेर काढलं'.

  • Share this:

( नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर करणारा उत्सव. नवरात्रोत्सव म्हणजे नव्या विचारांचं जागरण. नवरात्रोत्सव म्हणजे मांगल्याची सुरूवात. अशा या पवित्र पर्वावर आम्ही तुम्हाला करून देणार आहोत महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची ओळख. 'Durgotsav 2018' मधून. या महिलांनी सर्व आव्हानांवर मात करत, संघर्ष करत समाजाला प्रेरणा दिली.)

मुंबई : डॉ. विनया जंगले. प्रसिद्ध पशुवैद्यकीय अधिकारी आणि अडचणीत सापडलेल्या जंगली प्राण्यांची सुटका करणाऱ्या तज्ज्ञ. विनया मॅडम ज्या काळात शिक्षण घेत होत्या त्या काळात  प्राण्यांच्या डॉक्टरला समाजात प्रतिष्ठा नव्हती. पण निसर्ग प्राणी यांच्यावर असलेलं प्रेम आणि काही वेगळं करून दाखवण्याची तीव्र इच्छा यामुळं त्यांनी व्हेटर्नरीचा कोर्स निवडला. त्या काळात एका मुलीनं असा विचार करणं हे धाडसाचं होतं.

रत्नागिरी जिल्ह्यतलं खेड हे त्यांचं मुळ गाव. घरी गुरं-ढोरं असल्यानं त्यांनी गुरांचा डॉक्टरच होण्याचा निर्णय घेतला. नातेवाईकांचा विरोध असतानाही आई-वडील पाठीशी राहिल्यानं त्यांनी मुंबईत येऊन १९९२--९७ या काळात BVSC हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांना आपली वाट सापडली.

अनेक नोकऱ्या केल्यानंतर त्यांची खरी ओळख निर्माण झाली ती मुंबईतल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये नियुक्त झाल्यावर. ते काम आव्हानात्मक होतं. या क्षेत्रात महिलांचा वावर हा तसा दुर्मिळच. जोखिम, धाडस आणि संयमाची परिक्षा पाहणारं हे काम असल्यानं सुरूवातीला अनेक शंका व्यक्त केल्या जात होत्या. मात्र सर्व शंकांना दूर करून विनया जंगले यांनी आपल्या कामानं वेगळी छाप सोडली.

त्यांनी कधी गावात, कधी मशिदीत, कधी घरात, शाळेत शिरलेल्या बिबट्या, हरणांना सहीसलामत बाहेर काढलं.  राष्ट्रीय उद्यानात काम करताना तर त्यांच्या टीमने 25 ते 30 बिबट्यांची  सुटका केलीय. हे काम जोखमीचं होतं. त्याच वेळी त्यांचा मुलगा नील हा लहान होता. रात्री अपरात्री रेस्क्यू ऑपरेशन्ससाठी जावं लागत असायचं.

त्यांचे पती हे आय.टी.क्षेत्रात नोकरीला होते. त्यामुळं त्यांनाही अनेकदा रात्री ऑफिसात थांबावं लागत असे. अशा वेळी डॉ. विनया या काही महिन्यांच्या आपल्या मुलाला सोबत घेऊन रेस्क्यू ऑपरेशन्ससाठी जायच्या. त्या बिबट्याच्या सुटकेसाठी काम करायच्या तर त्यांचा मुलगा हा त्यांच्या गाडीच्या मागच्या सीटवर झोपलेला असायचा.

ही सगळी कसरत करत असताना त्यांच्यावर अनेक संकटं आली. काही वेळा बिबट्यांनी हल्लेही केले. पण या सगळ्या संकटातून त्यांचा निर्धार आणखी पक्का झाला. या जंगली प्राण्यांनी मनुष्य वस्तीत अतिक्रमण केलं अशी सारखी ओऱड होते मात्र त्यांचं मत वेगळं आहे. बिबट्यांनी नाही तर माणसांनी त्यांच्या जंगलात अतिक्रमण केलं अशी त्यांची भूमिका आहे.

हे काम करत असताना प्राण्यांचा स्वभाव, त्यांच्या सवयी, त्यांच्यात होत असलेले बदल, जंगलात होत असलेलं माणसांचं आक्रमण याचाही त्यांनी अभ्यास केलाय. त्यावरची त्यांची अनेक पुस्तकही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या धाडसाला, संघर्षाला आमचा सलाम.

हेही वाचा...

#Durgotsav2018 : असंघटित कामगारांसाठी 'एल्गार' पुकारणाऱ्या पारोमिता गोस्वामी

#Durgotsav2018 : जीवघेणे हल्ले पचवून आदिवासींसाठी लढणाऱ्या डॉ. स्मिता कोल्हेंची प्रेरक कहाणी

#Durgotsav2018 : 'स्वप्ना'तली जिद्द प्रत्यक्षात उतरविणारी रेल्वे इंजिन ड्रायव्हर

 

 

First published: October 12, 2018, 10:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading