डॉ.दाभोलकर हत्या प्रकरण : हल्लेखोरांनी नष्ट केली चार पिस्तुलं, सीबीआयचा दावा

डॉ.दाभोलकर हत्या प्रकरण : हल्लेखोरांनी नष्ट केली चार पिस्तुलं, सीबीआयचा दावा

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी वैभव राऊत आणि शरद कळसकर यांनी यावर्षी चार पिस्तुलं तोडून त्यांची मुंबई आणि ठाण्यात विल्हेवाट लावल्याचा सीबीआयचा दावा.

  • Share this:

पुणे,ता.15 सप्टेंबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी वैभव राऊत आणि शरद कळसकर यांनी यावर्षी चार पिस्तुलं तोडून त्यांची मुंबई आणि ठाण्यात विल्हेवाट लावली. ही पिस्तुलं त्यांनी तोडून खाडीमध्ये फेकून दिली असा दावा सीबीआयने आज कोर्टात केला. हत्येच्या वेळी एकूण चार जण उपस्थित होते असा दावाही सीबीआयने केला आहे. डॉ.दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम.एस.कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी ही चार पिस्तुलं वापरण्यात आली होती का हे आता तपासातून पुढे येणार आहे.

वैभव राऊत आणि शरद कळसकर २३ जुलै 2018 च्या रात्री वैभव राऊतच्या घरुन निघाले. त्यांच्याकडे असलेल्या चार पिस्तुलांची त्यांना विल्हेवाट लावायची होती. ती पिस्तुलं त्यांनी तोडली आणि पिस्तुलाचे तूकडे एका पुलावरुन खाडीच्या पाण्यात फेकून दिले. हे तुकडे जिथे फेकले ती जागा ठाण्यातील कळव्याचा पूल, वसईमधला खाडी पूल किंवा कल्याणमधील खाडी पूल यापैकी एक जागा होती.

मात्र रात्रीची वेळ असल्याने या तीनपैकी नक्की कोणत्या जागी पिस्तुलाचे तुकडे टाकण्यात आले हे शरद कळसकरला आत्ता आठवत नसल्याने त्याची आणखी चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडी वाढवून देण्यात यावी असा दावाही सीबीआयने केला आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या वेळी घटनास्थळी एकुण चार जण उपस्थित होते. दाभोलकरांची हत्या पुण्यातील ज्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर झाली त्या पुलावर दाभोलकर यांना ओळखणारे दोघे जण आधीच पोहचले होते. त्यानंतर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे पुलावर पोहचले.

जेव्हा दाभोलकर पुलावर आले तेव्हा शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी हेच दाभोलकर आहेत का याबाबत तिथे आधीच उपस्थित असलेल्या दोघांकडून खात्री केली. ती होताच दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यात आल्या. कळसकर आणि अंदुरेला दाभोलकरांची ओळख पटवून देणारे दोघेजण हत्येच्या कटात सहभागी होते असं सीबीआय च्या तपासात समोर आलंय. त्या दोघांचा शोध सी बी आय ने सुरू केलाय. याच गोष्टीच्या तपासासाठी शरद कळसकरची पोलिस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.

 

 

VIDEO: हा पाहा लहान मुलींना पट्ट्याने निर्दयपणे मारणारा स्वीमिंग कोच

First published: September 15, 2018, 6:05 PM IST

ताज्या बातम्या