S M L

हॉटेलमधला 'चहा' ते 'मॅगसेसे' पुरस्कार, डॉ.भरत वाटवानींचा प्रेरणादायक प्रवास

नुसतं कळवळा येवून चालत नाही. मनोरूग्णांच्या मदतीसाठी समाजानं पुढे आलं तरच या मोठ्या पुरस्काराचं समाधान आहे. या संवेदना जाग्या झाल्या नाहीत तर काहीच अर्थ नाही.

Ajay Kautikwar | Updated On: Jul 30, 2018 09:49 PM IST

हॉटेलमधला 'चहा' ते 'मॅगसेसे' पुरस्कार, डॉ.भरत वाटवानींचा प्रेरणादायक प्रवास

कर्जत,ता. 30 जुलै : डॉ. भरत वाटवानींना प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आणि त्यांच्या कामावर जागतिक मोहोर उमटली. आता जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. पण गेल्या 30 वर्षात त्यांना हे काम उभं करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला, अपमान पचवावा लागला. मनोरूग्णांच्या पुनर्वसनाचं हे कामं नेमकं चालतं कसं? हे पेशंट्स असतात कुठले? त्यांच्यावर उपचार कसे केले जातात? त्यासाठी झटणारी माणसं आहेत तरी कोण? असे अनेक प्रश्न आज विचारले जाताहेत. त्या प्रश्नांचा वेध घेण्यासाठी 'न्यूज18 लोकमत'ने कर्जत इथल्या 'श्रद्धा पुनर्वसन केंद्रा'ला भेट दिली. डॉ. भरत वाटवानी आणि त्यांचे सहकारी करत असलेलं काम प्रत्यक्ष पाहिलं. समाजात नकारात्मकता वाढत असताना निरपेक्षपणे सुरू असलेलं त्यांचं काम हे प्रत्येकाला प्रेरणा देणारं ठरणार आहे.

संवेदना जाग्या झाल्या पाहिजे

मॅगसेसे पुरस्कार मिळाल्यापासून लोकांची श्रद्धा पुनर्वसन केंद्रावर रिघ लागलीय. लोक येतात, शुभेच्छा देतात अनेकांच्या डोळ्यात पाणीही असतं. तुमचं काम खूप चांगलं आहे असं लोक सांगतात. पण माझी काळजी त्या पुढची आहे. हे काम पुढे गेलं पाहिजे. नुसतं कळवळा येवून चालत नाही. मनोरूग्णांच्या मदतीसाठी समाजानं पुढे आलं तरच या मोठ्या पुरस्काराचं समाधान आहे. या संवेदना जाग्या झाल्या नाहीत तर काहीच अर्थ नाही. मनोरूग्णांच्या पुनर्वसन कार्यासाठी नुकताच मॅगसेसे पुरस्कार मिळालेल्या डॉ. भरत वाटवानी अतिशय तळमळीनं 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.आव्हानात्मक प्रवास

मॅगसेसे पुरस्कार मिळाल्यापासून डॉ. भरत वाटवानींना क्षणाचीही उसंत नाही. बोलणं एवढं झालं की त्यांचा घसाच बसला. पण समाजानं टाकून दिलेल्या, भरकटलेल्या माणसांविषयीची तळमळ त्यांना शांत बसू देत नाही. 30 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या कामावर आता जगानं मोहोर उमटवलीय. पण हे काम सोपं नव्हतं. रस्त्यावरच्या मनोरूग्णांना शोधणं, त्यांच्यावर उपचार करणं, त्यांचं पुनर्वसन करणं आणि नंतर त्यांच्या कुटूंबियांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या स्वाधिन करणं असं अत्यंत अवघड काम आपल्या साथिदारांच्या मदतीनं ते अखंडपणे करत आहेत. त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला, अपमान पचवावा लागला. लोकांना जोडत डॉ. भरत वाटवानी आणि त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता वाटवानी अशा अनेक अनाथांचे आज नाथ झाले आहेत.

आयुष्याला कलाटणी देणारा चहा

Loading...
Loading...

डॉ. भरत आणि डॉ. स्मिता वाटवानी हे दोघही मानसोपचारतज्ज्ञ. दहिसरला त्यांच क्लिनिक होतं. उत्तम प्रॅक्टिसही होती. दोघही डॉक्टर असल्याने ते खोऱ्यानं पैसा ओढू शकले असते. पण वंचित लोकांसाठी काहीतरी करावं ही उर्मी त्यांना शांत बसू देत नव्हती. 1989 मध्ये एका हॉटेलमध्ये चहा घेत असताना त्यांना हॉटेलसमोरच्या नालीमध्ये एक तरूण पाणी पित असलेला दिसला. दोघही ते दृश्य पाहून हेलावले आणि त्यांनी त्या तरूणाला आपल्या क्लिनिकमध्ये नेलं. घाण झालेलं शरीर, अंगाचा वास, केस वाढलेले, जीर्ण झालेले कपडे अशा त्या तरूणाला त्यांनी स्वच्छ केलं. त्याच्यावर उपचार केले आणि दोन महिन्यात तो तरूण बरा झाला. त्याला जेव्हा आठवायला लागलं, त्याची ओळख समजल्यावर तर त्यांना धक्काच बसला. तो डिएमलटी झालेला तरूण होता. हैदराबादमध्ये त्याची पॅथोलॉजी होती. नोकरी निमित्त तो मुंबईत आला होता. त्याची मानसिक स्थिती बिघडली आणि तो भरकटला. दोन महिने रस्त्यावर त्यानं भटकत काढले. तो तरूण स्क्रिझोफेनियाचा रूग्ण होता. या घटनेनंतर त्यांनी अशा रूग्णांसाठी काम करण्याचा निश्चय केला.

 

बाबा आमटेंच्या भेटीनं आयुष्यच बदललं

मुंबईत कामाला सुरूवात झाल्यानंतर डॉ. भरत वाटवानी बाबा आमटेंची भेट घ्यायला 2004 मध्ये विदर्भात हेमलकशाला गेले. जात असताना वाटेत त्यांना साखळदंडाने बांधलेला एक मनोरूग्ण रस्त्यावर दिसला. त्यांनी त्या मनोरूग्णाला प्रकाश आमटेंच्या लोकबिरादरी प्रकल्पात नेलं. प्रकाश आमटेंनी त्यांच्या हाता पायात असलेले साखळदंड तोडले आणि त्याच्यावर उपचार केले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते साखळदंड बाबांनी आपल्या हातात घातले होते. त्या मनोरूग्णाला काय वेदना होत असतील त्याचा अनुभव घेण्यासाठी बाबांनी असं केलं होतं. समाज अशा लोकांकडे किती असंवेदनशीलतेनं बघतो असं सांगत बाबांनी डॉ. भरत वाटवानींना आणखी जोमानं काम करण्याचा सल्ला दिला आणि वाटवानींच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.

लोकांच्या त्रासामुळे झाला 'श्रद्धा'चा जन्म

कामाला जोमानं सुरूवात केल्यावर डॉ.वाटवानी दाम्पत्याने दहिसरमध्ये एका घरात अशा मनोरूग्णांसाठी सेंटर सुरू केलं. पण अशा लोकांकडे कुठल्या नजरेनं बघावं याची मानसिकताच आपल्या समाजात नसल्याने लोकांनी या सेंटरला विरोध केला. अशा वेड्या लोकांमुळे आमच्या मुलांवर परिणाम होईल असं सांगत आजुबाजूच्या सोसायटीमधल्या लोकांनी या सेटंरविरूद्ध पोलीसात तक्रार केली. डॉक्टरांवर खोटेनाटे आरोप केले. लोकांचा विरोध आणि काम वाढवण्याची असलेली प्रचंड इच्छा यामुळे शेवटी डॉ. वाटवानींनी कर्जत मध्ये मोठी जागा घेऊन श्रद्धा पुनर्वसन केंद्राची स्थापना केली.

माणूसकी वाढवणारं 'श्रद्धा'

कर्जतच्या मोकळ्या जागेत 2006 मध्ये श्रद्धा पुनर्वसन केंद्राची स्थापना झाली. मनोरूग्णांना हक्काचा आधार आणि निवारा मिळाला. आज या केंद्रात 128 पेशंट्स आहेत. त्यात 77 पुरूष तर 51 महिलांचा समावेश आहे. केंद्राची उत्तम इमारत झालीय. या केंद्रात पुरूषांसाठी दोन वॉर्ड आणि महिलांसाठी एक वॉर्ड आहे. 42 प्रशिक्षित लोकांचा उत्तम स्टाफ आहे. या सर्व कर्मचाऱ्यांमुळेच हे काम मला उभारता आलं. याचं सर्व श्रेय त्यांचं आहे असं डॉक्टर मनमोकळेपणे मान्य करतात. आत्तापर्यंत 7 हजारांपेक्षा जास्त रूग्णांवर त्यांनी उपचार केले असून काही अपवाद वगळता प्रत्येकाला त्यांनी त्याच्या कुटूंबियांच्या स्वाधीन केलं आहे.  पुरस्कार मिळाल्यानंतर केंद्राकडे चौकशीचं प्रमाण वाढलंय. लोक पेशंट असल्याची माहिती देत आहेत. त्या सर्वांना कसं सामावून घ्यायचं असा नवा प्रश्न आता वाटवानींना भेडसावतोय.

काळजाला पाझर फोडणारे अनुभव

श्रद्धा पुनर्वसन केंद्रात फक्त मनोरूग्णांवर उपचारच होत नाही तर त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून त्यांना त्यांच्या कुटूंबियांपर्यंत पोहोचवलंही जातं. ते काम अतिशय अवघड असं आहे. पण त्यामधून मिळणारा आनंद शब्दात मांडणं शक्यच नसल्याच्या भावना इथं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. या केंद्रात सर्व देशातून पेशंट्स येतात. त्यामुळं इथं काम करणारे कर्मचारीही विविध राज्यातले आहेत. पेशंटचा पत्ता शोधून काढून हे कर्मचारी त्यांना त्यांच्या कुटूंबियांच्या स्वाधीन करतात. एक महिला तर तब्बल 27 वर्षानंतर तीच्या घरी गेली. उत्तर प्रदेशातल्या तरूणाला जेव्हा काही महिन्यांपर्वी त्याच्या घरी सोडण्यात आलं तेव्हा अवघं गाव त्याच्या स्वागतासाठी लोटलं होतं. त्याच्या आईला एवढा आनंद झाला की ती धाय मोकलून रडू लागली. एका पेशंटला जेव्हा घरी पोहोचवलं त्यावेळी काही तासांपूर्वीच त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. तीन वर्षांनी घरी परतलेल्या त्या मुलाने वडिलांचे अंतिम संस्कार केले. कुणाचे वडिल, आई, भाऊ, बहिण जेव्हा पुन्हा घरा जातात तेव्हा श्रद्धाचे कार्यकर्ते म्हणजे त्यांच्यासाठी देवदूतच असतात. कारण हरवलेले लोक पुन्हा सापडतील ही आशाच त्यांच्या कुटूंबियांनी सोडलेली असते. पुण्यातल्या एक पेशंट बरा झाला नंतर त्यानेच श्रद्धा केंद्रासाठी एक अॅम्बुलन्स भेट दिली. इथं येणाऱ्या पेशंट्समध्ये अनेक जण क्टर,इंजिनियर,वकिल,प्राध्यापकही आहेत. नेपाळमधूनही अनेक जण या केंद्रात येतात. एक इराणचा रूग्ण बरा होऊन पुन्हा आपल्या मायदेशी परतला. इथल्या प्रत्येक पेशंटची स्वत:ची एक कहाणी आहे आणि ही कहाणीच इथं काम करणाऱ्या प्रत्येकाची प्रेरणा आहे.

हे काम वाढलं पाहिजे

श्रद्धासारखी अनेक केंद्र राज्यात आणि देशात सुरू झाली पाहिजे. मनोरूग्णांकडे पाहण्याची समाजाची मानसिकता जोपर्यंत बदल नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही. लोकांच्या संवेदना जाग्या झाल्या मदतीसाठी लोक पुढं आले तरच बदल घडेल. मॅगसेसे पुरस्कार असा बदल घडवण्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाला डॉ. भरत वाटवानींनी समर्पित केला आहे. त्यांच्या त्या कामाला न्यूज18 लोकमतचा सलाम.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 30, 2018 09:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close