Home /News /news /

शिवसेना-भाजपच्या वादात आम्हाला ओढू नका, राष्ट्रवादीच्या नेत्याचा सल्ला

शिवसेना-भाजपच्या वादात आम्हाला ओढू नका, राष्ट्रवादीच्या नेत्याचा सल्ला

'भारतरत्न देऊन सरकार कोणाचा सन्मान करत असेल त्यात वाद उपस्थित करणे योग्य नाही. देशात अनेक महापुरुष होऊन गेले आहेत'

    शिर्डी,  04 जानेवारी : शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. त्यानंतर भाजपचे नेते सावरकरांच्या मुद्दावर सेनेवर निशाणा साधत आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी भाजपची कानउघडणी केली आहे. शिवसेना आणि भाजपात जो आधीपासून वाद होता, त्यात आम्हाला उगाच ओढू नका, असा सल्ला पटेल यांनी दिला. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आज शिर्डीमध्ये साईंच्या दर्शनाला आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपला सल्लावजा टोला लगावला. 'भारतरत्न देऊन सरकार कोणाचा सन्मान करत असेल त्यात वाद उपस्थित करणे योग्य नाही. देशात अनेक महापुरुष होऊन गेले आहेत. त्यांना भारतरत्न देण्याबाबत वाद होऊ नये अशी आमची भूमिका आहे' असं पटेल म्हणाले. तीन पक्षाचे सरकार असल्याने सुरुवातीला छोटया मोठ्या समस्या उद्भवत असतात .सर्व आमदारांना मंत्रिपद देणे शक्य नाही. जे शक्य आहे ते तिनही पक्ष करतायत. सोमवार पर्यंत सर्व मंत्री आपल्या खात्याचा कारभार सांभाळतील असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. तर किमान समान कार्यक्रमावर तिनही पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे वीर सावरकर यांच्या मुद्यावरून सरकारवर काही परिणाम होणार नाही. हे सरकार पाच वर्ष चालेल असंही पटेल म्हणाले. वीर सावरकरांचा बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी सन्मानच केलेला आहे. त्यामुळे सावरकारांच्या नातवाची भेट उद्धव ठाकरे नाकारतील असं वाटत नाही, असंही पटेल यांनी सांगितलं. शरद पवार यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. शरद पवारांनी काही वरिष्ठ नेत्यांना गृहमंत्री पदाबद्दल विचारले तेव्हा त्यांनी इतर खाते मागितले यापेक्षा वेगळा अर्थ लावू नये, असं मतही पटेल यांनी व्यक्त केलं. नुकतेच शरद पवारांनी राष्ट्रवादीत गृहमंत्रिपद घेण्यास कोणीही इच्छुक नसल्याचं म्हटलं होत त्यावर प्रफुल्ल पटेल यांनी ही प्रतिक्रिया दिली.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, Congress, Maharashtra CM, NCP, Praful patel, Shiv sena

    पुढील बातम्या