मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /'मोलाचा जीव वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका', मुख्यमंत्री शिंदेंचं शेतकऱ्यांना भावनिक पत्र, पण मदत कधी?

'मोलाचा जीव वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका', मुख्यमंत्री शिंदेंचं शेतकऱ्यांना भावनिक पत्र, पण मदत कधी?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हे चित्र पाहून मात्र एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून विषण्ण होऊन जाते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 ऑगस्ट : 'राज्यातील शेती आणि शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारे निर्णय जाहीर करतानाच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी आज विधानसभेत सांगितलं. यावेळी, 'शेतकरी बांधवांना भावनिक आवाहन करत 'रडायचं नाही, लढायचं...अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना भावनिक साद घातली. परंतु, ओला दुष्काळाबाबत कोणतीही घोषणा केली नाही.

राज्यात अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. त्यानंतर  विधानसभेत चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकरी बांधवांना उद्देशून लिहिलेले पत्र वाचून दाखवले.

'महाराष्ट्र  लढवय्यांचा... कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे. भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान  शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आले आहेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचेच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राची आणि देशाची भूक भागवण्याचेही काम करत आहात.  म्हणून मराठी मातीवर पहिला हक्क शेतकरी बांधवांचा आहे, असं भावनिक उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

(राज ठाकरे आता कोणता 'झेंडा' घेणार हाती? भाषणाने सस्पेंन्स वाढला)

'नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना मन कासावीस होऊन जाते, तुमच्यातले काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात आणि आत्मघाताचा मार्ग पत्कारतात. हे चित्र पाहून मात्र एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून विषण्ण होऊन जाते.  आपल्याच घरातले कुणी आपण गमावल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

'शेतकरी बांधवांना, तुम्ही आहात तर छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्या-पाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे, की 'रडायचं नाही, लढायचं...' त्याप्रमाणे तुम्ही खचून न जाता तुमचा तोलामोलाचा जीव  वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका. आत्महत्या करू नका', अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी घातली.

(मुख्यमंत्री शिंदे अधिवेशनात शेतकऱ्यांवर बोलत होते, मंत्रालयाबाहेरच शेतकऱ्याने घेतले पेटवून!)

'मी तुमच्या सारखा सरळसाधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात. काळजाला भिडतात. या आसमानी संकटातून, या सावकारी दुष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटीबद्ध आहे. आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचे लखलखते यश असते. मी आणि माझे सरकार सतत तुमच्या सोबत आहे, याची खात्री बाळगा... जीव देणे बंद करूयात, जीव लावूयात एकमेकांना.. चला, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूया आणि आपण मिळून छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

First published:

Tags: पावसाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन महाराष्ट्र, विधीमंडळ पावसाळी अधिवेशन २०२२