S M L

'आम्हाला संघर्ष नको,डॉल्बीवर कारवाई होणारच!',नांगरे पाटलांचा इशारा

'कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आम्ही कार्य करतो'

Updated On: Sep 11, 2018 07:43 PM IST

'आम्हाला संघर्ष नको,डॉल्बीवर कारवाई होणारच!',नांगरे पाटलांचा इशारा

कोल्हापूर, 11 सप्टेंबर : 'जब तक है जान तब तक डॉल्बी रहेगी...' असं म्हणत डाॅल्बी वाजणारच असा इशारा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ध्वनी प्रदुषण करणाऱ्या डॉल्बीवर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलंय.

लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांच्यात संघर्ष करण्याची आमची भूमिका नाही. कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आम्ही कार्य करतो अशा शब्दात नांगरे पाटलांनी स्पष्ट केलंय.

गणपती मिरवणुकीत रात्रीच्या वेळीही डॉल्बी वाजवण्यावरुन खासदार उदयनराजे भोसले यांनी न्यायालय आणि पोलीस प्रशासनाला खुलं आव्हान देत डीजे लावणारच असल्याचा सज्जड दम भरलाय. आता पोलीस प्रशासनही डीजेवर कारवाई करण्याबाबत ठाम असल्याचे संकेत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिलेत.

लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांच्यात संघर्ष करण्याची आमची भूमिका नाही. कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आम्ही कार्य करतो. त्यामुळे डीजेबाबत आम्ही पहिल्यांदा जागृती, शिक्षण आणि नंतर अंमलबजावणी या टप्प्याने आम्ही काम करतोय. पर्यावरण संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याचे सुप्रीम आणि हायकोर्टाचे आदेश आहेत. त्यात पाच वर्षाची शिक्षा आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे अशी आठवण नांगरे पाटलांनी करून दिली.

मी स्वतः गणेशभक्त आहे. त्यामुळे कोणत्याही गणेश भक्तावर कारवाई करण्याची आमची इच्छा नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

उदयनराजे यांची भेट घेऊन त्यांचे प्रबोधन करणार का? असा प्रश्न न्यूज१८ लोकमतच्या प्रतिनिधीने विचारल्यानंतर मात्र, आमच्यात उगाच फटाके पेटवू नका असं म्हणत विश्वास नांगरे पाटलांनी उदयनराजे यांच्याबद्दल बोलणं टाळलं.

त्यामुळे उदयनराजेंनी पोलीस प्रशासन आणि न्यायलयाला दिलेल्या आव्हानाबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.

काय म्हणाले होते उदयनराजे ?

२३ तारखेला विसर्जन आहे तेव्हा पाहू काय होतं आणि काय नाही होतं आणि कसं नाही होत. डॉल्बी लागलीच पाहिजेत, डेसीमल ठरवणारे कोर्ट आणि पोलिस डिपार्टमेंट कोण? डेसीमल ठरवतात तुमच्या आमच्यासारखे अवली लोक.

खऱ्या अर्थाने आम्ही गणपतीचे भक्त आहोत. गणपतीला त्रास होत नाही तर इतरांना त्रास व्हायचं काही कारणच नाही. त्रास तरीही झालाच तर एक दोन दिवस सहन करायला काही जात नाही.

मोठ्या आवाजाने बिल्डींग पडतात.. हे पडतं... ते पडतं... या साऱ्या गोष्टी खोट्या आहेत. उलट जुन्या इमारती पाडण्यासाठी याचा वापर करा. जुन्या इमारतींची डागडुजी करत नाहीत. मात्र

तुम्ही बिचाऱ्या "सुसंस्कृत पोरांचे" हट्ट ऐकत नाहीत. मग काय करायचं हे पाहिलं जाईल.

ही धमकी नाही तर ही मी समज देतोय, प्लॅन करा नाहीतर तुम्ही कोणत्याही कोर्टात जावा डॉल्बी तर असणारच आहे. जब तक है जान तब तक डॉल्बी रहेगी... जब तक डॉल्बी रहेगी तब तक गणपती रहेगा. एवढंच सांगतो आता बोलायची वेळ नाही.

VIDEO : अन् काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या 'नरेंद्र मोदी झिंदाबाद'च्या घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 11, 2018 07:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close