Home /News /news /

'धर्मधुरीण' कादंबरीला लाभसेटवार पुरस्कार प्रदान

'धर्मधुरीण' कादंबरीला लाभसेटवार पुरस्कार प्रदान

मुंबई मराठी साहित्य संघ आणि ग्रंथालीच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात सोमवारी अनंत लाभसेटवार पुरस्कार डॉ. प्रकाश लोथे यांच्या 'धर्मधुरीण' या कादंबरीला देण्यात आला.

मुंबई 26 फेब्रुवारी : मुंबई मराठी साहित्य संघ आणि ग्रंथालीच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात सोमवारी अनंत लाभसेटवार फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या ललित साहित्य पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यावर्षीचा पुरस्कार डॉ. प्रकाश लोथे यांच्या 'धर्मधुरीण' या कादंबरीला देण्यात आला. न्यूज18 लोकमतचे समुह संपादक डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते कादंबरीचे लेखक डॉ. लोथे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1 लाख रूपये, शाल आणि श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप आहे. मुळचे विदर्भाचे असलेले कादंबरीचे लेखक डॉ. लोथे हे अमेरिकेत बलरोग तज्ञ आहेत. वैद्यकीय व्यवसायात असूनही त्यांनी लेखनाची आपली आवड जोपासत ही कादंबरी लिहिलीय. ग्रंथालिने ही कादंबरी प्रकाशीत केलीय. यावेळी डॉ. अनंत लाभसेटवार यांच्या 'हुंकार' या लघुकथा संग्रहाचंही प्रकाशन झालं. अमेरिकेत राहत असलो तर मातीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच वैदर्भीय बोली आणि मातीचा गंध असलेल्या तीन पिढ्यांच्या वैचारिक घुसळणीची ही कादंबरी असल्याचं डॉ. लोथे यांनी सांगितंल. तर अनंत लाभसेटवार यांनी लाभसेटवार फाऊंडेशनची भूमिका विशद केली. तर डॉ. उदय निरगुडकर यांनी मराठी माणसांच्या भाषेविषयीच्या अनास्थेबद्दल खंत व्यक्त केली. तमिळ, मल्याळम्, बंगाली, तेलुगू या भाषेविषयी त्या त्या राज्यातल्या लोकांना जो अभिमान असतो तो अभिमान आणि आस्था मराठी माणसाला वाटत नाही. भाषेमधली विविधता टिकवत जोपर्यंत मराठीचा जागर होणार नाही तोपर्यंत मराठीची स्थिती सुधारणार नाही असं मत डॉ. निरगुडकर यांनी व्यक्त केलं. कार्यक्रमाला अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. उषा तांबे, ग्रंथालीचे दिनकर गांगल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
First published:

Tags: Award, Dharmadhurin, Labhsetwar, Novel, Sahitya

पुढील बातम्या