‘या’ तारखेपर्यंत राहणार आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर बंदी, केंद्राने जाहीर केली नवी तारीख

‘या’ तारखेपर्यंत राहणार आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर बंदी, केंद्राने जाहीर केली नवी तारीख

तब्बल दोन महिन्यांच्या Lockdownनंतर 25 मेपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र ही सेवा मर्यादीत शहरांमध्येच सुरू करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई 3 जुलै: देशात सध्या Unlock-2 ची प्रक्रिया सुरू आहे. सगळे व्यवहार पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रस्ते वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. देशांतर्गत विमानसेवाही मर्यादीत स्वरुपात सुरू झाली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर बंदी ( Ban on international flights) कायम ठेवण्यात आली आहे. आता 31 जुलैपर्यंत ही सेवा बंदच राहील असं विमान वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ही काळजी घेण्यात आल्याचं बोललं जात आहे.

DGCAने 26 जूनला 15 जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान उड्डणांना बंदी राहिल असं म्हटलं होतं. आता ही बंदी 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आल्यने प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे. 6 मेपासून एअर इंडिया आणि इतर काही खासगी विमान कंपन्या ‘मिशन वंदे मातरम्’ मोहिमे अंतर्गत विदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याची मोहिम राबवत असून त्याअंतर्गत आत्तापर्यंत हजारो प्रवासी भारतात परतले आहेत.

तब्बल दोन महिन्यांच्या Lockdownनंतर 25 मेपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र ही सेवा मर्यादीत शहरांमध्येच सुरू करण्यात आली आहे.

देशात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा मोठ्या वेगात वाढत आहे. आज पहिल्यांदा देशात तब्बल नवीन कोरोना रुग्णांचा आकडा हा 21 हजारांच्या घरात गेला. गेल्या 24 तासांत तब्बल 20 हजार 903 रुग्ण सापडले. तर, गेल्या 24 तासांत 379 लोकांचा मृत्यू झाला. यासह भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 6 लाख 25 हजार 544 झाला आहे. देशात सध्या 2 लाख 27 हजार 437 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 18 हजार 213 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 3 लाख 79 हजार 891 रुग्ण निरोगीही झाले आहेत.

देशात सर्वात जास्त कोरोना रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आहेत . गेल्या 24 तासांत राज्यात 6330 नवीन कोरोना रुग्ण सापडले. तर दिल्लीत 2373. तामिळनाडुमध्ये 4343, उत्तर प्रदेश 817, पश्चिम बंगाल 649, राजस्थान 350 आणि पंजाबमध्ये 120 रुग्ण सापडले. ही आकडेवारी चिंता वाढवणारी असली तरी, भारतात निरोगी रुग्णांची संख्या दिलासा देणारी आहे. भारताचा रिकव्हरी रेट 60% झाला आहे.

संपादन - अजय कौटिकवार

First published: July 3, 2020, 6:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading