कुठल्याही वेगळ्या चष्म्यातून पाहू नका, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

कुठल्याही वेगळ्या चष्म्यातून पाहू नका, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

पत्रकार परिषद घेण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नसल्यामुळे कार्यवाहू मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे कारभार पाहत आहेत.

  • Share this:

मुंबई, 09 नोव्हेंबर : शेकडो वर्षांच्या अयोध्येतील मंदिर-मशिदीच्या वादावर सुप्रीम कोर्टाने शनिवारी ऐतिहासिक निर्णय दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जागेवरच राम मंदिर होईल तर मुस्लिमांना मशीद बांधण्यासाठी पर्यायी जागा मिळणार असल्याचा निकाल दिला. याच पार्श्वभूमिवर कार्यवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

पत्रकार परिषद घेण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नसल्यामुळे कार्यवाहू मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे कारभार पाहत आहेत. यासाठी वारंवार राज्यपालांची भेट होणार असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अयोध्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले.

अयोध्या प्रकणात कार्यवाहू मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

- रामजन्मभूमीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत

- अयोध्येचा निकाल म्हणजे कोणाचाही विजय आणि पराजय नाही. तर भारतीय आस्था निर्माण करणारा निकाल

- लोकशाही मुल्यांना मजबूत करणारा निर्णय

- सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला कोणत्याही वेगळ्या चष्म्यातून पाहू नका, हा निर्णय देशाच्या अस्मितेचा आहे.

- अभिनिवेशाशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा स्विकार करण्यात आला आहे.

- महाराष्ट्राच्या जनतेचं मी स्वागत करतो

- सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या तत्वाखाली काम करू

दरम्यान, राज्यात अजूनही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. या सगळ्यात कार्यवाहू मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या काही बड्या नेत्यांनी राज्यपालांची आज भेट घेतली. या भेटीमध्ये सत्ता स्थापनेवर काही तोडगा निघाला का? भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी दावा करावा यावर राज्यपालांनी काही चर्चा केली का? या संदर्भात मात्र कोणतीही माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली नाही. त्यामुळे सत्तेचा वाद कायम आहे असंच म्हणावं लागेल.

इतर बातम्या - निकाल अयोध्या प्रकरणाचा पण ट्रोल होतोय अक्षय कुमार, तुम्ही हे PHOTO पाहिलेत का?

निकालानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले...

'सुप्रीम कोर्टानं 5 एकर जागा मशीद उभारण्यासाठी दिली आहे. सरकार त्याचं पालन करेल. राम मंदिर उभारण्यासाठी जी ट्रस्ट स्थापन केली जाणार आहे त्याबाबत सरकार योग्य तो निर्णय घेईल. आमचं काम फक्त राम मंदिर उभं राहवं. मधल्या काही कालावधीमध्ये काही कारणांमुळे तोडगा काढणं शक्य झालं नाही. त्यामुळे हा वाद न्यायप्रविष्ट राहिला. मात्र आता न्यायालयानं निर्णय देऊन वादावर पडदा घातला आहे. या निर्णयाचं शांतपणे स्वागत करायला हवं. लोकांनी संयमानं आनंद साजरा करावा, हा निकाल जय पराजयाचा नाही तर कोर्टाच्या निर्णय़ानं न्याय़ मिळाला आहे. भूतकाळातील झाल्या-गेल्या सर्व गोष्टी विसरून एकत्र य़ेऊऩ राम मंदिर उभारण्यासाठी प्रयत्न करायला हवा'. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचं स्वागत करत मोहन भागवत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी रामजन्मूभूमी संदर्भात ज्यांनी विचार मांडले, सत्य आणि न्याय देणारे तसच न्यायाधीश आणि सर्व पक्षांच्या नेत्यांचे आभार मानले आहेत.

अयोध्याच्या ऐतिहासिक निकालावर संभाजी भिडे यांची धक्कादायक प्रतिक्रिया

सुप्रीम कोर्टाने हिंदू पक्षकार रामलल्लाच्या बाजूने हा निकाल दिला आहे. मुस्लिम पक्षकार सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच इतरत्र 5 एकर जमीन देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे सुन्नी वक्फ बोर्डाने स्वागत केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालाचे देशभरात सर्व स्तरावर स्वागत करण्यात आले असून शांततेचे आवाहन केले असताना शिव प्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे.

अयोध्याचा निकाल हा देशाच्या दृष्टीने कलंकित आहे. मुसलमानांना 5 एकर जमीन दिली, हे चुकीचे आहे. शिवछत्रपती यांना दुःख झाले असेल. मशिदीसाठी अयोध्येत 5 एकर जागा देण्याचा काय संबंध असे भिडे गुरूजी म्हणाले.

अयोध्येतील मंदिर-मशिदीच्या ऐतिहासिक निकालावर संजय राऊतांनी केले 'हे' tweet

सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालाचे देशभरात सर्व स्तरावर स्वागत करण्यात आले असून शांततेचे आवाहन केले आहे. यादरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'ट्वीट' करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'पहले मंदिर, फिर सरकार!!! अयोध्या में मंदिर महाराष्ट्र में सरकार… जय श्रीराम!!! असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

First published: November 9, 2019, 2:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading