फडणवीसांच्या प्रतिक्रियेनंतर शरद पवार झाले अलर्ट, उद्धव ठाकरेंना बोलावलं बैठकीला!

फडणवीसांच्या प्रतिक्रियेनंतर शरद पवार झाले अलर्ट, उद्धव ठाकरेंना बोलावलं बैठकीला!

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

  • Share this:

मुंबई, 27 सप्टेंबर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे आता महाविकास आघाडीमध्ये पडसाद उमटले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत तातडीने बैठक बोलावली आहे.

शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज बैठक होणार आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होते हे महत्त्वाचे ठरणार आहे. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच दोन्ही नेत्यांनी सूचक विधान केल्यामुळे शरद पवार यांनी बैठक बोलावल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधान मोदी यांना आम्ही नेता मानतो, राऊतांचे विधान

त्याआधी आज सकाळीच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन या भेटीबद्दल खुलासा केला होता. यावेळी ते म्हणाले की, 'देवेंद्र फडणवीस यांची भेट ही गुप्तपणे मुळीच नव्हती. 'सामना'च्या मुलाखतीसाठी त्यांची भेट घेतली होती. गप्पा मारल्या आणि एकत्र जेवण केले. मुळात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत कुणीही कुणाचे शत्रू नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे काही आमचे कायमचे शत्रू नाही. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे. उद्धव ठाकरे हे सुद्धा त्यांना आपला नेता मानतात आणि मी सुद्धा मानतो' असं राऊत म्हणाले.

सरकार बनवण्याची सध्या कोणतीही घाई भाजपला नाही - फडणवीस

दरम्यान, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी  या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली.  'संजय राऊत यांच्या भेटीमुळे शिवसेनेसोबत अशी कोणतीही चर्चा सुरू नाही. त्यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यासाठी असे कोणतेही कारण नाही' असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

तसंच, 'महाविकास आघाडी सरकारचे जे काम सुरू आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळे हे सरकार आपल्या कृतीमुळे कोसळेल, ज्यावेळी हे सरकार पडेल त्यावेळी आम्ही बघू.  पण सरकार बनवण्याची सध्या कोणतीही घाई भाजपला नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Published by: sachin Salve
First published: September 27, 2020, 2:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या